Ranjan Choudhary : नवी दिल्ली : झारखंडमधील काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या निवासस्थानी आणि कंपनीच्या कार्यालयांत प्रप्तीकर विभागाची छापेमारी झाली. दरम्यान सापडलेल्या ३५४ कोटी संपत्तीवर आता काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी भाष्य केलं आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचं आजचं कामकाज संपल्यानंतर अधीर रंजन चौधरी यांनी एएनआयशी संवाद साधला.
अधीर रंजन चौधरी म्हणाले, खासदार धीरज साहू यांच्याकडे सापडलेल्या पैशांचा आणि काँग्रेसचा काहीच संबंध नाही. ते त्यांचे पैसे आहेत. ती संपत्ती केवळ एका कुटुंबाची आहे. तसेच ते पैसे आमच्या खासदाराचे आहेत का हेदेखील कोणाला माहिती नाही. ते पैसे धीरज साहू यांचे आहेत की, त्यांचे वडील, आजोबा किंवा भावाचे आहेत हे कोणालाच माहिती नाही. त्यामुळे सरकारी तपास यंत्रणांनी या गोष्टीचा तपास करावा. तसेच जे लोक आत्ता आक्रमकपणे बोलत आहेत तेच लोक नीरव मोदी किंवा मेहुल चोकसी यांची प्रकरणं बाहेर आली तेव्हा मूग गिळून गप्प बसले होते.
प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांना या नोटा मोजण्यासाठी तब्बल पाच दिवस लागले. या कारवाईवरून भारतीय जनता पार्टीने काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून सर्वच भाजप नेते साहू यांच्यासह काँग्रेस पक्षावर टीका करत आहेत. तर दुसरीकडे धीरज साहू यांचा काँग्रेसने त्यांचा कुठल्याही प्रकारे बचाव केला नाही. उलट काँग्रेस नेत्यांनी या प्रकरणापासून स्वतःला वेगळं ठेवलं आहे. काँग्रेसचे सचिव आणि खासदार जयराम रमेश यांनी एक्सवर, खासदार धीरज साहू यांच्या व्यवसायाशी काँग्रेस पक्षाचा काहीही संबंध नाही. या संपत्तीबाबत फक्त साहूच सांगू शकतात. तसेच प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या घर-कार्यालयात सापडलेल्या रोख रकमेबाबत केवळ साहू यांनीच स्पष्ट करावं. असे म्हटले आहे.