रायगड : मुंबई-गोवा महामार्गावर कारला टोईंग व्हॅनने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. रायगडच्या वीर रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली आहे. या अपघातामधील मृत आणि जखमी हे सर्वजण महाड येथे राहणारे असल्याची माहिती मिळत आहे. रात्री उशिरा अपघाताची ही घटना घडली आहे. या अपघाताचा तपास रायगड पोलिसांकडून सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई- गोवा महामार्गावर वीर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात झाला आहे. डिझल संपल्याने बंद पडलेली स्कॉपिओ कार महामार्गाच्या लगत थांबली असताना याच वेळी पाठीमागून आलेल्या टोईंग व्हॅनने या कारला जोरदार धडक दिली या अपघातामध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत.
सूर्यकांत मोरे, साहिल शेलार (२५ वर्षे) आणि प्रसाद नातेकर (२५ वर्षे) असं मृत्यू झालेल्या तिघांची नावं आहेत. हे तिघेही महाडच्या कुंभार आळीमध्ये राहणारे होते. तर समिप मिंडे (३५ वर्षे, राहणार दासगाव), सुरज नलावडे (३४ वर्षे, रहाणार- चांभार खिंड) आणि शुभम माटल (२६ वर्षे – राहणार शिरगाव) हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरून हे सर्वजण प्रवास करत असताना हा अपघात झाला आहे.
महाडवरून मुंबईला जात असताना वीर रेल्वे स्थानकाजवळ स्कॉपिओ कारचे डिझल संपल्याने कार बाजूला थांबवण्यात आली होती. कारमधून प्रवास करणारे हे ६ जण कारशेजारी उभे होते. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या टोईंग व्हॅनने बंद स्कॉपिओला जोरदार धडक दिली. टोईंग व्हॅनच्या धडकेन स्कॉपिओ कार सुमारे ५० मीटर लांब उडवली गेली आणि सर्व्हीस रोडच्या पलिकडील जाऊन खड्डयात पडली. अपघातादरम्यान कारजवळ उभे असलेल्यांना जोरदार धडक बसल्याने यामधील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून तिघे जण जखमी झालेत आहेत.