हनुमंत चिकणे
लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील तीर्थक्षेत्र रामदरा परिसराकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असून खोदाई झाल्याने खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायतीसह स्थानिक लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने या रस्त्याला कोणी वालीच नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. धार्मिक तसेच नैसर्गिक पर्यटन स्थळ म्हणून या परिसराचा विकास करण्याची गरज असून आतापर्यंत तरी शासकीय पातळीवर त्या संदर्भात काहीच हालचाल झालेली दिसून येत नाही.
तीर्थक्षेत्र रामदरा येथे येणाऱ्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. पुणे शहर व परिसरातील नागरिकांना धार्मिक, नैसर्गिक पर्यटन करण्यासाठी व हौशी तरुणांना ट्रेकींगचे प्राथमिक धडे गिरवण्यासाठी असलेला सह्याद्रीच्या पर्वत रांगातील डोंगर यामुळे या ठिकाणी खुप मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. पावसामुळे डोंगर पुर्णपणे हिरवागार झाला असून एखाद्या नववधूने हिरवा शालू नेसल्या सारखा सुंदर दिसत आहे. त्यामुळे धुके, थंडगार वाऱ्यात विलोभनीय निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी व धार्मिक पर्यटन करण्यासाठी हजारो पर्यटक या ठिकाणी गर्दी करीत आहेत.
डोंगराच्या पायथ्याशी महामार्गावरुन सात किलोमीटर अंतरावर तीर्थक्षेत्र रामदरा वसले आहे. जाताना लागणारा रस्ता थोडा अरुंद असून या रस्त्यावर बरेच खड्डे पडले आहेत. शाळकरी मुले, रूग्ण यांचे अतोनात हाल होत आहेत. अनेकांना मणक्याचे आजार जडले आहेत. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची गरज आहे. त्यातच रामदरा शिवालय परिसराकडे जाणाऱ्या नवीन मुठा कालव्यावरील ५७ वर्षापूर्वी तयार करण्यात आलेला पूल अखेरची घटका मोजत आहे. ऐन वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या या पुलावरून दररोज सुमारे पाच हजार नागरिक येथून ये जा करीत आहेत. या गर्दीच्या पुलावरून चारचाकी गाडी व एखादे अवजड वाहन गेल्यास हा पूल हलत आहे. यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता असल्याची भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील केसकर वस्ती, रुपणर वस्ती, बल्लाळा या भागातील नागरिक रामदरा या तिर्थक्षेत्राकडे याच पुलावरून जात आहेत. तसेच या वर्दळीच्या पुलाला कठडे ही खराब झाल्याने वाहनचालकांना सावधानता बाळगत या मार्गावरून जावे लागत आहे. त्यामुळे याकडे सार्वजनिक पाटबंधारे विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी येथील स्थानिक नागरिक करीत आहेत.
दरम्यान, लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील कोळपे वस्ती, केसकर वस्ती, रुपनर वस्ती, ढेले वस्ती, फुरसुंगी रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी व या परिसरातील शेताकडे तसेच तीर्थक्षेत्र रामदरा शिवालयात जाण्यासाठी याच पुलाचा वापर करून जावे लागते. तसेच या वर्दळीच्या पुलाचे लोखंडी कठडे ही खराब झाल्याने वाहनचालकांना सावधानता बाळगत या मार्गावरून जावे लागत आहे. त्यामुळे याकडे जलसंपदा विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी येथील स्थानिक नागरिक करीत आहेत.
कठडे असूनही नसल्यासारखेच..!
नवख्या नागरिकांना पुलाचा अंदाज नसल्याने, तसेच पुलाची माहिती नसल्याने मोठ्या अपघाताला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. गावामध्ये येण्यासाठी एकच पूल असल्याने प्रवासास धोका आहे. त्याच पुलावरील उघडे कठडे अपघातास निमंत्रण देत आहेत. पुलाच्या दोन्ही बाजूला कठडे असून नसल्यासारखेच आहेत, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.