अयनुद्दीन सोलंकी / घाटंजी (यवतमाळ) : आर्णी – केळापूरचे माजी आमदार राजू तोडसाम हे 28 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. या वेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रशेखर बावनकुळे, माजी केंद्रीय गृह राज्य मंत्री तथा मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर आदीं उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी माजी आमदार राजू तोडसाम यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला होता.
दरम्यान, माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचे पुत्र जितेंद्र शिवाजीराव मोघे यांना काँग्रेस पक्षांकडून काल (दि. २६) उमेदवारी जाहीर झाली आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राजू तोडसाम हे भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर आर्णी – केळापूर विधानसभा मतदार संघातून माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांना पराभूत करुन निवडून आले होते. त्यानंतर राजू तोडसाम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. थोड्या दिवसांत त्यांनी पुन्हा बी.आर.एस. (तेलंगाणा) पक्षात प्रवेश केला.
मात्र, सद्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू असतांना राजू तोडसाम यांनी भाजपा पक्षात प्रवेश केल्याने आर्णी – केळापूर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी त्यांनाच मिळेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. दरम्यान, भाजपाकडून राजू तोडसाम यांना आर्णी – केळापूर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून उद्या (दि. 28) पांढरकवडा येथील उप विभागीय अधिकारी सुहास गाडे यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. विशेष म्हणजे आर्णी – केळापूर विधानसभा मतदार संघाची निवडणूक एकतर्फी होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.