पुणे : “राजू यांची प्रकृती स्थिर आहे. ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत असून त्यांच्यासाठी प्रार्थना करणाऱ्यांचे आम्ही आभार मानतो. सोशल मीडियावर पसरणाऱ्या फेक न्यूजकडे कृपया दुर्लक्ष करा. त्यांच्यासाठी प्रार्थना करा”, अशी पोस्ट इन्स्टाग्रामवर करण्यात आली. या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे.”
कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना बुधवारी (ता.१०) हृदयविकाराचा झटका आला होता. झटक्यानंतर रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्यावर अँजियोप्लास्टी करण्यात आली. राजू यांच्या प्रकृतीविषयी सोशल मीडियावर चिंता व्यक्त होत असतानाच त्यांच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी (ता. १२) त्याबद्दल माहिती दिली. राजू यांची प्रकृती स्थिर असून फेक न्यूजकडे दुर्लक्ष करा अशी विनंती त्यांनी केली आहे.
राजू यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर याविषयी पोस्ट लिहिण्यात आली. राजू श्रीवास्तव यांनी बुधवारी सकाळी व्यायाम केला होता. त्याच दिवशी ते पुन्हा एकदा वर्कआऊट करायला गेले तेव्हा त्यांना बरं वाटत नव्हतं. त्यानंतर त्यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यांच्या ट्रेनरने त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेलं, जिथे डॉक्टरांनी विलंब न करता त्यांना CPR दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीकडून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली आहे. पंतप्रधान मोदी यांनी राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीला फोन केला होता. मोदींनी राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि मदतीचं आश्वासनही दिलं.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही राजू श्रीवास्तव यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली होती. राजनाथ सिंह आणि योगी आदित्यनाथ यांनीही कुटुंबाला मदतीचं आश्वासन दिलं आहे.