-बापू मुळीक
सासवड : पुरंदर तालुक्यातील वीर येथील देवस्थान ट्रस्टचा कारभार गाव पातळीवर चालल्यामुळे अनेक गैरव्यवहार उघडकीस आले आहेत. त्यामुळे धर्मादाय सह आयुक्त पुणे यांच्याकडे लेखी तक्रार केल्या आहेत. यामध्ये तक्रारीची सुनावणी बाकी असताना आपले पितळ उघडे पडू नये, म्हणून एक वर्ष कालावधी असताना सर्वसाधारण बैठक घेण्यात आली व त्या ठिकाणी नवीन विश्वस्तांची निवड करण्यात आली आहे. असे तक्रारदार सतीश वचकल व सतीश बुरुंगुले यांनी सांगितले.
गैर कारभारावर अनेक आरोप करणारे विरोधकही सत्तेत सहभागी झाल्यामुळे वीर गावात विविध प्रश्नांना वाचा फुटली आहे. श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांच्या मनमानी कारभाराला कंटाळून मी राजीनामा दिला आहे, त्यामुळे त्या संशयास्पद, गैरकारभार याबाबत मी न्यायालयात दाद मागणार आहे.
-रवींद्र धुमाळ, माजी व्हाईस चेअरमन- वीर देवस्थान ट्रस्ट
नवीन विश्वस्ता निवडीमध्ये गाव पातळीवर सर्वसाधारण सभेमध्ये चेअरमन राजेंद्र धुमाळ, पाच वर्षे. तर व्हाईस चेअरमन अमोल धुमाळ यांच्याकडे एक वर्षासाठी पद दिले आहे. प्रसाद धुमाळ यांच्याकडे दीड वर्ष व्हाईस चेअरमन पद व विराज धुमाळ यांच्याकडे अडीच वर्ष उपाध्यक्ष पदाची धुरा देण्याचे ठरले आहे. विश्वस्त म्हणून बाळासो समगीर, अमोल धोंडीबा धुमाळ, काशिनाथ धुमाळ, प्रमिला देशमुख, अलका जाधव, जयवंतराव सोनवणे, दिलीप कदम, श्रीकांत थिटे, सुनील धुमाळ याचबरोबर तांत्रिक कारणाने दोन जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत.
पुढच्या बैठकीमध्ये त्या जागा भरण्यात येतील असेही सांगण्यात आले. निवडीनंतर राजेंद्र धुमाळ यांनी सांगितले की, माझ्या कार्यकालात कारभार पारदर्शकपणे करणार आहे. सर्वांना सहमतीत घेऊनच कारभार करणार आहे. संयमी, नम्रता, सहनशीलता ठेवूनच पाच वर्षे काम करणार असल्याचे धुमाळ यांनी सांगितले.