उरुळी कांचन, (पुणे): पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या आशीर्वादाने व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण, पावसाचे पाणी जाण्यासाठी उघडे नसलेले चेंबर यामुळे हा महामार्ग बंद पडण्याच्या मार्गावर आहे. पावसाच्या पाण्याने संपूर्ण रस्ता जलमय झाला आहे. महामार्ग प्राधिकरणच्या मनमानी कारभारामुळे पाण्यातून वाट काढत शाळकरी मुले, व्यावसायिक, नागरिक, व वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.
महामार्गावर पाणी निचरा होत नसल्याने उरुळी कांचन ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी व लोणी काळभोर वाहतूक पोलिसांनी मार्ग काढीत थोडासा दिलासा दिला आहे. रस्त्याच्या बाजूस असलेल्या व्यावसायिकांनी मुरूम भरल्यामुळे पाणी रस्त्यावर येऊन साठून राहत आहे. त्यामुळे वाहन चालक अपघात ग्रस्त होत आहेत, अपघाताच्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले नसल्याचे उघड झाले आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अंतर्गत असलेल्या महामार्गावर जोपर्यंत टोल वसुली सुरु होती त्यावेळीही रस्त्याची डागडुजी एजन्सी रडत रडतच करत होती. आतातर शासनाच्या अधिकाऱ्यांना तो राष्ट्रीय महामार्ग आहे याचाच विसर पडला आहे, कोणतीही दुरुस्ती व नैमित्तिक देखभाल करुन रस्ता सुस्थितीत ठेवणे आपले कर्तव्य आहे हे ते विसरले आहेत. त्यामुळे पुणे – सोलापूर महामार्ग बंद पडण्याच्या मार्गावर आहे.
उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील इरीगेशन कॉलनी, चौधरी माथा, हरणा कॉम्प्लेक्स समोर व उरुळी कांचन पोलीस दूरक्षेत्रासमोरील परिसरात पाणी साचून राहत आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून वाहतुकीच्या गैरसोयी बाबत नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. या ठिकाणी अपघाताची मालिका सुरु आहे. त्यामुळे या परिसरातून वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी येथील स्थानिक नागरिक करीत आहेत.
पुणे- सोलापुर महामार्गवरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट ते कासुर्डी (ता. दौंड ) या दरम्यानचा रस्ता “बाधा, वापरा व हस्तातंरीत करा (बिओटी)” या तत्वानुसार आयआरबी या खाजगी कंपनीने विकसीत केला होता. मात्र मुदत संपल्याने चार वर्षापुर्वी आयआरबी कंपनीने वरील रस्ता शासनाकडे हस्तातंरीत केला. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या दुर्लक्षामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या गटरलाईन बंद असल्यामुळे पावसाचे पाणी साठून राहण्याने वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या पाण्यातून धोकादायक पद्धतीने प्रवास करावा लागत असल्याची तक्रार वाहनचालक करू लागले आहेत.
दरम्यान, या ठिकाणी या अगोदरही अनेक वेळा गंभीर अपघात झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणची गटारलाईन साफ करुन व चेंबर मोकळे करून पाणी वाहून जाण्याकरिता चेंबर खुले करण्याची मागणीने जोर धरला आहे. उरुळी कांचनचे सरपंच राजेंद्र कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष कांचन, सुभाष बगाडे, दत्तात्रय कांचन, शुभम काळे, लोणी काळभोर वाहतूक शाखेचे पोलीस व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सदर महामार्गावरील साचलेले पाणी काढण्यास मदत केली.
याबाबत उरुळी कांचनचे सरपंच राजेंद्र कांचन म्हणाले, “या संदर्भात तत्कालीन राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांच्याशी चर्चा करून सदर निवेदन दिले होते. मात्र त्यांनी सांगितले कि, सदरचा महामार्ग हा राष्ट्रीय प्राधिकरण खात्याकडे वर्ग करण्यात आला आहे. महामार्ग प्राधिकरण अधिकारी यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार केला तसेच समक्ष भेट घेतली मात्र अधिकारी सहकार्य करीत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी एखाद्या मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागणार आहे. तोपर्यंत सदरचे अधिकारी काम करणार नाहीत.”