सुरेश घाडगे
परंडा : गणपती बाप्पा मोरया.. मंगलमूर्ती मोरया.. असा जयघोष करत घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणरायाचे बुधवारी (ता.३१) ढोलताशांच्या निनादात जल्लोषात व मोठ्या उत्साहात आगमन झाले. गणरायाच्या स्वागतासाठी परंडा तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे.
लाडक्या गणरायाला नेण्यासाठी सकाळपासूनच गणेशभक्तांनी शहरातील विविध बाजारपेठांमध्ये गर्दी केली होती. आबालवृद्ध डोक्याला भगवी पट्टी बांधून ढोलताशांच्या निनादात नाचत होते. घरातील पुरुष मंडळी नवीन कपडे परिधान करून गणेशमूर्ती आणण्यासाठी गेल्यानंतर घरातील महिला दारात गणेशाच्या आगमनाची वाट पाहत उभ्या होत्या. गणेशाचे आगमन होताच घरातील सर्वच मंडळींच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.
परंडा शहरासह तालुक्यात विविध गणेश मंडळ तसेच घरगुती श्री गणरायाची प्रतिष्ठापणा मोठया भक्त्तीभावाने उत्साहात झाली. शहरातील जय भवानी चौकातील जय भवानी गणेश मंडळाने पावसात सवाद्य मिरवणुक काढून उत्साहात श्रीची स्थापना केली.
दरम्यान, गणरायाच्या आगमनाने वरूणराजाची कृपादृष्टी झाली आहे. तब्बल २० दिवसांच्या प्रदीर्घ उघडीपीनंतर पाऊस पडला आहे. यामुळे शेतकरी वर्गांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.