नवी दिल्ली : उद्यापासून (१ जुलै) अनेक नियम बदलणार असून, रेल्वे तिकिटात देखील मोठे बदल होणार आहेत. रेल्वेने प्रवासी भाडेदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. यामुळे नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. ही भाडेवाढ, एक्सप्रेस आणि सुपरफास्ट गाड्यांच्या विविध वर्गांमध्ये लागू होणार असून रेल्वे मंडळाने या वाढीव दरांची अंमलबजावणी उद्यापासून करणार असल्याचं सांगितलं आहे.

रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, एसी आणि नॉन एसी या दोन्ही प्रकारच्या डब्यांमध्ये भाडेवाढ लागू केली आहे.
जनरल नॉन-एसी च्या स्लीपर क्लास आणि फर्स्ट क्लासचे भाडे प्रति किलोमीटर 50 पैशांनी वाढवण्यात आले आहे. तर मेल आणि एक्सप्रेस नॉन-एसी गाड्यांचे भाडे प्रति किलोमीटर 1 पैशाने वाढवण्यात आले आहे. याशिवाय, एसी क्लासमध्ये प्रति किलोमीटर 2 पैशांनी वाढ जाहीर केली आहे.

तर रेल्वेने जनरल डब्यातील सेकंड क्लास सामान्य प्रवासासाठी 500 किलोमीटरपर्यंत कोणतीही भाडेवाढ केलेली नाही. पण 501 ते 1500 किलोमीटरसाठी 5 रुपये, 1501ते 2500 किमीसाठी 10 रुपये आणि 2501 ते 3000 किमीसाठी 15 रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. तर, फर्स्ट क्लास सामान्य आणि स्लीपर क्लास सामान्यमध्ये प्रति किलोमीटर अर्धा पैसा भाडेवाढ केली आहे.

दुसरीकडे लोकल आणि सीझन तिकीटधारकांना दिलासा देण्यात आला आहे. रेल्वेने उपनगरीय (लोकल) गाड्या आणि मासिक/त्रैमासिक पास (MST/QST) धारक प्रवाशांना या भाडेवाढीतून वगळले आहे. अधिसूचनेनुसार, उपनगरीय आणि सीझन तिकीट दरांमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
‘या’ गाड्यांच्या दरात भाडेवाढ
रेल्वेने तेजस , राजधानी, शताब्दी, दुरांतो, वंदे भारत, हमसफर, अमृत भारत, तेजस, महामना, गतिमान, अंत्योदय, गरीब रथ, जन शताब्दी, युवा एक्सप्रेस, जनरल ट्रेन सर्व्हिसेस (नॉन-सबर्गन), अनुभूती कोच आणि एसी व्हिस्टाडोम कोच यासारख्या गाड्यांच्या मूळ तिकिटांच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. ही वाढ प्रत्येक वर्गासाठी निश्चित केलेल्या नवीन भाडे यादीनुसार असेल. असे अधिसूचनेत सांगण्यात आले आहे.







