मुंबई : विधानसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. प्रोटेम स्पीकर कालिदास कोळंबकर यांनी हा निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार आशिष शेलार, चंद्रकांत पाटील यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं आहे. त्यानंतर राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली. यानंतर भाजपने विधानसभा अध्यक्षपदावर दावा करत त्याची जबाबदारी राहुल नार्वेकर यांच्याकडे दिली. यानंतर आता पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांच्याकडे विधानसभेचे अध्यक्षपद जाणार आहे. यामुळे विधानसभेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा शपथ घेणारे महाराष्ट्रातील पहिले अध्यक्ष म्हणून त्यांची नोंद केली जाणार आहे.
राहुल नार्वेकर विधानसभेच्या अध्यक्ष होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,” राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे. मी तमाम विधानसभा सदस्यांच्या वतीने आणि राज्याच्या 12 कोटी जनतेच्या वतीने अभिनंदन करतो. विरोधी पक्षाचे आभार मानतो, काही अपवाद वगळता अध्यक्षांची बिनविरोध निवड करण्याची परंपरा आहे, त्या परंपरेचा मान राखत आपल्या निवडीला विरोधी पक्षाच्या सदस्यांचे आणि गटनेत्यांचे आभार मानतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्यात एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री होते, त्यातला एक वकील होता, तुमच्यासारखा निष्णात वकील अध्यक्षांच्या खुर्चीत बसला, या खुर्चीला तुम्ही न्याय द्याल शंका नाही, असा विश्वास देखील फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला.
कोण आहे राहुल नार्वेकर?
राहुल नार्वेकर हे भाजपच्या तिकीटावर मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. ते महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि देशातील कोणत्याही राज्याचे सभापती म्हणून निवडून आलेली दुसरी सर्वात तरुण व्यक्ती (वय 44) आहे. नार्वेकर यांची जून 2016 मध्ये राज्यपालांनी नामनिर्देशित सदस्य म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेवर निवड केली होती.