मुंबई : आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे देशभरात संतापाची लाट पसरली आहे. या कठीण प्रसंगात काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी साहिलच्या पालकांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. “तुम्ही एकटे नाही आहात, मी तुमच्यासोबत खंबीरपणे उभा आहे,” असा विश्वास देत त्यांनी वाकोडे कुटुंबाचे सांत्वन केले आणि शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले.

युथ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी वाकोडे कुटुंबाची भेट घेऊन परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर राहुल गांधी यांच्याशी त्यांची फोनवर बातचीत घडवून आणली. साहिलच्या कुटुंबीयांचा धीर खचू नये, यासाठी राहुल गांधी यांनी त्यांना मानसिक व न्यायालयीन पाठबळ देण्याचा प्रयत्न केला.

साहिलचे वडील रवींद्र आणि आई सोनाली वाकोडे यांनी संस्थेतील प्राध्यापक व प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. साहिलला कॅम्पसमध्ये जातीवरून अपमानास्पद वागणूक दिली जात होती आणि त्याचा मानसिक छळ केला जात होता, असा दावा पालकांनी केला आहे.

साहिलने परीक्षेत मोबाईल आणि चॅटजीपीटीचा वापर करून कॉपी करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा सुरुवातीला आयआयटी प्रशासनाने केला होता. मात्र, चौकशी पूर्ण होण्याआधीच असे दावे जाहीर केल्यामुळे नंतर प्रशासनाला माफी मागावी लागली.या वादानंतर संबंधित प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांना पदावरून हटवून सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. परीक्षा कक्षातील शेवटच्या 20 मिनिटांचे सीसीटीव्ही फुटेज सध्या समोर आले असून, त्यात साहिल पर्यवेक्षकांसोबत बाहेर पडताना दिसतो.
सध्या मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने आणि सखोल चौकशी करत आहे. जातीय भेदभाव आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपांमधील सत्य लवकरच समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







