न्हावरे : नागरगाव (ता.शिरूर) येथे अज्ञात चोरट्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे दोन विद्युत ट्रान्सफार्मर खाली पाडून त्यामधील ऑईल काढून नुकसान केले. त्यानंतर दोन्ही ट्रान्सफार्मरमधील तब्बल 140 किलो तांब्याच्या तारा चोरांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. चोरी झालेल्या तांब्याच्या तारांची अंदाजे किंमत 84 हजार रुपये आहे.

ही घटना सोमवारी(ता.21) सायंकाळी चार ते मंगळवारी (ता.23) सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या दरम्यान नागरगाव येथे घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी पांढरे नंबर 2 नावाचा 100/22 केव्हीए क्षमतेचा ट्रान्सफार्मर खाली पाडून त्यातील अंदाजे 80 किलो तांब्याच्या तारा चोरून नेल्या. तसेच किसन शेलार नावाचा 25/22 केव्हीए क्षमतेचा ट्रान्सफार्मर फोडून त्यातील सुमारे 60 किलो तांब्याच्या तारा लंपास केल्या.

चोरट्यांनी ट्रान्सफार्मर खाली पाडल्याने तसेच त्यातील ऑईल सांडल्याने महावितरणचे अतिरिक्त आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे केवळ तांब्याच्या तारांची चोरीच नव्हे, तर विद्युत यंत्रणेचेही नुकसान झाल्याचे या घटनेमुळे समोर आले आहे.

याप्रकरणी सुरज शंकर लोहारे (रा. पारगाव,ता.दौंड, जि.पुणे) यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान,या चोरीमागे कोणाचा हात आहे,तसेच चोरी गेलेला तांब्याचा माल कोठे विकला गेला याचा शोध घेण्यासाठी शिरूर पोलिसांकडून तपास सुरू आहे.






