लोणी काळभोर, (पुणे) : दिवेघाटात रात्रीच्या वेळी तरुणावर जीवघेणा हल्ला करून फरार झालेल्या आरोपीला फुरसुंगी पोलिसांनी इंदापुरातून शिताफीने अटक केली. आरोपी वाहनाला बनावट नंबर प्लेट लावून स्वतःचे अस्तित्व लपवत फिरत असल्याचे तपासात समोर आले आहे.

आदिनाथ दत्तात्रय मोरे (रा. कऱ्हावागज, ता. बारामती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. प्रवीण राजकुमार शेटे (वय ३२, रा. सातभाई आळी, मारुती मंदिरामागे, ता. पुरंदर) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 ऑगस्टला मध्यरात्री बारा ते साडेबारा वाजण्याच्या सुमारास प्रवीण शेटेहे किया सेल्टॉस गाडीमधून पुण्याहून जेजुरीकडे जात होते. दिवेघाटाच्या पायथ्यापासून तिसऱ्या वळणावर अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला करून कपाळावर व डोक्यात मारहाण केली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटना घडलेले ठिकाण निर्मनुष्य असून तेथे सीसीटीव्हीची सुविधा नव्हती. जखमीला आरोपीच्या देहबोलीव्यतिरिक्त ठोस माहिती नव्हती. त्यामुळे तपास पथकाने दिवेघाट ते जेजुरी मार्गावरील तब्बल 65 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून एमएच 12 झेडएल 0450 हा वाहन क्रमांक तपासात निष्पन्न झाला.
मात्र, या वाहनाच्या पत्त्यावर पोलिस पोहोचले असता वाहन दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर असल्याचे आढळले. त्यानंतर आरोपीने गुन्ह्याच्या वेळी वाहनाला बनावट नंबर प्लेट लावल्याचा संशय बळावला. गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी आदिनाथ दत्तात्रय मोरे (रा. कहरवागज, ता. बारामती) असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. मोरे हा काही गुन्ह्यांमध्ये फरार असून मोबाईल फोन वारंवार बंद ठेवत असल्याने त्याचा माग काढणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत होते. तपास पथकाने गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे इंदापुरात दोन दिवस तीन रात्री मुक्काम करून आरोपीचा शोध घेतला.
आरोपी दुपारच्या सुमारास फ्रॉन्स गाडी (एमएच 42 बीएस 7680) मधून जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून इंदापूर-पुणे रोडवरील इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर सीएनजी भरण्यासाठी थांबलेल्या आरोपीला सुरक्षेची खबरदारी घेत सापळा रचून ताब्यात घेतले.
दरम्यान, पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगण्यात आले असून, गुन्ह्यावेळी वाहनाला बनावट नंबर प्लेट लावल्याचेही त्याने सांगितले. त्याच्याकडून फ्रॉन्स चारचाकी वाहन हस्तगत करण्यात आले आहे. ही कारवाई तपास पथक प्रभारी पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार यांच्या पथकाने केली.






