पुणे : पुण्यातील कोरेगाव पार्कमधील सोसायटीमध्ये किरकोळ वादातून एकमेकांच्या विरोधात थेट विनयभंगाचे गुन्हे दाखल केल्याचा प्रकार समोर आला आहे. कोरेगाव पार्कमधील कोणार्क एन्क्लेव्ह गृहरचना सहकारी सोसायटीमध्ये शेजारी शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबांनी एकमेकांच्या विरोधात थेट विनयभंगाचे गुन्हे दाखल कले आहेत. यातील एक घटना २ मार्च रोजी सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान तसेच, दुसरी घटना २०१२ ते २०२४ या कालावधीमध्ये घडल्याचे दोन्ही फिर्यादींमध्ये नमूद करण्यात आले आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये उच्च न्यायालयाच्या एका वकिलाचा देखील समावेश आहे. याप्रकरणी एका ३८ वर्षीय महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार शेजारी राहणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, ही महिला घराच्या प्रवेशद्वाराजवळ पूजा करीत होती. त्यावेळी आरोपी तरुणाने तिला ‘नमस्कार मॅडम. आपल्याला आमच्यामुळे काही त्रास आहे का? काही त्रास असेल, तर मला सांगा.’ असे म्हणत विचित्र हावभाव केले. या संदर्भात तिच्या पतीने आरोपीला ‘व्हाट्सअप’वर मेसेज करून तसेच ‘ईमेल’द्वारे मेसेज पाठवला होता.
त्यामध्ये ‘तुमच्या कॅमेऱ्यामुळे माझ्या पत्नीला घराबाहेर पडताना अवघडल्यासारखे वाटते. तुमचा सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा अँगल आमच्या घराच्या प्रवेशद्वारावरून हटवून, स्वतःच्या घराच्या आवारात घेण्याबाबत’ विनंती केली होती. तेव्हा आरोपीने आपली राजकीय व्यक्तीसोबत ओळख असल्याचे सांगून ‘सीसीटीव्ही कॅमेरे काढणार नाही. तुम्हाला काय करायचे ते करा’ अशी दमदाटी केली, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव करीत आहेत.
तर, या फिर्यादी महिलेच्या पतीविरोधात शेजारी राहणाऱ्या ४४ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही महिला कामानिमित्त जिन्यामधून बाहेर घराबाहेर पडली. त्यावेळी आरोपीने तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत तिच्या एकांतवासाचा भंग केला. पाठीमागून तिला हाताने स्पर्श केला. ‘आज खूप छान दिसतेस. माझ्याबरोबर फिरायला येतेस का?’ असे म्हणत अश्लील हावभाव केले.
या महिलेच्या भावाने आरोपीला याबाबत जाब विचारला असता, ‘मी हायकोर्टात वकील आहे. माझे कोणी काही वाकडे करू शकणार नाही.’ अशी दमदाटी केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शांतामल कोल्लूरे करत आहेत.