मुंबई : सर्वसामान्यांना लवकरच एलपीजी सिलिंडरवर क्यूआर कोड दिसणार आहेत. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने ही नवीन सुविधा सुरू केली आहे. या सुविधेत वापरल्या गेलेल्या क्यूआर कोडला विशेष महत्त्व आहे. कारण या क्यूआर कोडच्या माध्यमातून नागरिकांना त्यांना मिळालेल्या सिलिंडर विषयी सर्व माहिती मिळणार आहे.
‘प्युअर फॉर शुअर’या टॅगलाईन खाली भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने ही नवीन सुविधा सुरू केली आहे. यानुसार आता बीपीसीएलचे एलपीजी सिलिंडर ज्यावेळी ग्राहकाच्या घरी डिलीव्हर केले जातील त्यावेळी ते सील प्रूफ असतील. याशिवाय त्यावर आता क्यूआर कोड देखील असणार आहे. त्यामुळे देशातील हा पहिला नवा प्रयोग असणार आहेत. आता तो कितपत खरा ठरतो हे पाहाव लागेलं.
आत्तापर्यंत ग्राहकांच्या घरी देण्यात आलेल्या सिलिंडर विषयी अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यात महत्त्वाचे कारण म्हणजे सिलिंडरचे वजन कमी भरण, गॅस लवकर संपणे. आता सिलिंडर जर सीलबंद होऊन येणार असेल तर ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही.
ग्राहकांना होणार फायदा
सिलिंडरला छेड छाड प्रूफ सील असेल. तर, क्यूआर कोड देखील असेल. या क्यूआर कोडमध्ये सिलिंडरची सर्व माहिती असणार आहे. क्यूआर कोड स्कॅन केल्यावर ग्राहकांना सिग्नेचर ट्यूनसह एक खास प्युअर फॉर शुअर पॉप-अप दिसेल. यावर सिलिंडर संबंधित सर्व तपशील पॉप-अपमध्ये उपलब्ध आहे. सिलेंडर भरताना त्याचे एकूण वजन किती होते? सील होते की नाही इत्यादी माहिती यामधून मिळणार आहे.
डिलिव्हरी वुमनचा समावेश
ग्राहकांनी सिलेंडरची डिलिव्हरी स्वीकारण्यापूर्वी त्यांचे सिलिंडर सुरक्षित आहे की नाही हे तपासण्यासाठी याची फार मोठी मदत होणार आहे. सिलिंडरच्या सीलमध्ये काही छेडछाड झाली असेल तर क्यूआर कोड स्कॅन होणार नाही. ज्यामुळे पुढील वितरण थांबेल अशी माहितीही कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. या एलपीजी इकोसिस्टममध्ये डिलिव्हरी वुमनचा समावेश करण्याचा मानस आहे. कारण याचा वापर महिलांपेक्षा अधिक कोणी जास्त करत नाही. त्यामुळे महिला कर्मचारी यासाठी नेमण्यात येणार आहेत असेही कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.