हैदराबाद : ‘पुष्पा-२’ चित्रपटाच्या प्रीमियर शो दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत दगावलेल्या महिलेच्या कुटुंबास या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोमवारी ५० लाख रुपयांची मदत दिली. ४ डिसेंबर रोजी हैदराबादेतील संध्या सिनेमागृहात अभिनेता अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी गर्दी जमली होती. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत महिला दगावली होती, तर तिचा ८ वर्षीय मुलगा जखमी झाला होता. या मुलावर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नवीन येरमनी सोमवारी या मुलाला पाहण्यासाठी स्वतः रुग्णालयात पोहोचले होते.
तेथेच त्यांनी पीडित कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून ५० लाख रुपयांचा धनादेश दिला. महिलेच्या मृत्यूप्रकरणी कुटुंबीयांना संवेदनाही दिल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. उल्लेखनीय बाब म्हणजे या मृत्यूप्रकरणी महिलेच्या पतीने दाखल केलेल्या गुन्ह्याखाली पोलिसांनी नुकतीच अभिनेता अल्लू अर्जुनला अटक केली होती. रात्र तुरुंगात काढल्यानंतर अंतरीम जामिनावर त्याची सुटका करण्यात आली. त्यावेळी आपण अभिनेत्याला जबाबदार धरत नसून तक्रार माघारी घेण्यास तयार असल्याचे मयत महिलेच्या पतीने म्हटले होते. यादरम्यान पीडित कुटुंबास २५ लाखांची मदत देण्याचीही तयारी अल्लू अर्जुन दर्शविली होती.