अजित जगताप
सातारा : अलिकडच्या काळात विकास कामांपेक्षा धार्मिक भावनेला महत्व प्राप्त झाले आहे. हनुमान चालीसा, महाआरती म्हणजेच हिंदुत्व अशी काहींची धारणा झाली आहे. पण, ज्या गणरायांची दहा दिवस पूजाअर्चा केली. त्याच गणरायाच्या निर्माल्याचे पावित्र्य राखण्याचे कार्य येरळा नदी तीरावर मुस्लिम समाजातील मुन्ना मुल्ला यांनी वडूज ता खटाव येथे करून दाखविले आहे.
याबाबत माहिती अशी की, वडूज बसस्थानकाशेजारी किस्मत फोटो स्टुडिओचे पत्रकार व मितभाषी जैन्नुद्दीन ऊर्फ मुन्ना मुल्ला हे प्रयास सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. हिंदू – मुस्लिम ऐक्य टिकविण्यासाठी त्यांची धडपड पुर्वीपासून धडपड सुरू असते. सर्व जाती धर्माच्या लोकांना बातमीदारीतून न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची लेखणी सदैव तत्पर असते. दोन वर्षांच्या कोरोना संकटानंतर सर्वत्र श्री गणरायाचे भाविकांनी जल्लोषात स्वागत व मिरवणुकीने विसर्जन सुध्दा केले.
अशा वेळी वडूज नगरीतील अनेकांनी निर्माल्या टाकले. ते एकत्रित करून पत्रकार मुन्ना मुल्ला यांनी त्याचे पावित्र्य राखून ते व्यवस्थित रित्या कलश मध्ये ठेवण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या या कार्याची दखल पश्चिम महाराष्ट्रात घेतली गेली आहे. पवित्र रमजानच्या सणात ही अनेक हिंदू बांधवांना आपुलकीने खाऊ घालणारे मुन्ना मुल्ला एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून सर्व परिचित आहेत. व्यसनमुक्ती, प्लस्टिक मुक्ती, तंटामुक्ती अशा अनेक गोष्टी मध्ये त्यांचा सहभाग असतो. प्रयास सामाजिक संस्थेच्या माध्यमातून उपाध्यक्ष पदावर कार्यरत असताना त्यांनी वडूज नगरी व वडूज पोलीस ठाण्यात वृक्षारोपण केले होते. आज ही रोपे मोठी झाल्याचे पाहून त्यांना मनस्वी आनंद वाटत आहे.
बुधवार दि. ७ सप्टेंबर रोजी वडूजमधील काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व घरगुती गणपतींचे विसर्जन केल्यानंतर काहींनी निर्माल्य टाकून दिले होते. अशा वेळी येरळा नदीच्या पुलावर त्यांना निर्माल्याची पिशव्या दिसून आल्या. त्यांनी मोठ्या उत्साहात येरळा नदीच्या काठावर उभारलेल्या निर्माल्य कलशामध्ये ही निर्माल्याची पिशव्या रिकाम्या केल्या तसेच मुस्लिम समाजातील सहकार्याची भावना अधोरेखित केली.
इतर सदस्यांसोबत शहरातील प्रत्येक गणेश मंडळाला प्लँस्टिक मुक्तीसाठी संस्थेच्या वतीने कापडी पिशवी वाटप केली निर्माल्य संकलन व पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी त्यांच्या या सामाजिक बांधिलकीची सर्वत्र कौतुक होत आहे. मुन्ना मुल्ला यांचा सर्व धर्मियांच्या सणांमध्ये सक्रिय सहभाग असतो.त्यांच्या या मनोभावे निस्वार्थी सेवेमुळे त्यांचा एक चांगला व मोठा मित्र परिवार असून सर्वाना सहकार्य करणे. चहापान करून महिमान नवाजी करण्याचा त्यांची ख्याती आहे.
दरम्यान, प्रयास सामाजिक संस्थेने स्वखर्चातून सुमारे सत्तर हजार रुपये खर्चून वडूजकरांसाठी येरळा नदीच्या काठावर निर्माल्य कलश उभारला आहे. दैनंदिन पुजा, गणेशोत्सव,दुर्गात्सव या काळातील निर्माल्य संकलन या कलशामध्ये होत असते.या निर्माल्यापासून खतनिर्मिती करून याच संस्थेने नदीकाठी देशी वृक्षांची लागवड केलेल्या बागेतील वृक्षास हे खत दिले जाते.अशी माहिती देण्यात आली आहे.