पुणे : पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील पिसोळी शाळेच्या मुख्याध्यापकाचा मुरुडच्या काशिद येथील समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना २७ डिसेंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. धर्मेंद्र देशमुख (वय-56) असं मृत्यू झालेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, पिसोळी येथील महात्मा ज्योतिराव हायस्कूल येथील शाळेचा 11 जणांचा समूह काशीद समुद्र किनारी फिरण्यासाठी गेला होता. यामध्ये शिक्षकांसह मुख्याध्यापक सुद्धा होते. बरेच लोक काशीद समुद्र किनारी पोहण्यासाठी उतरले. पोहता पोहता या शाळेचे मुख्याध्यापक धर्मेंद्र देशमुख हे खोलवर पाण्यात खेचले गेले. ते बराच वेळ पाण्याखाली राहिले.
शेवटी किनार्यावरील जीवरक्षकांनी त्यांना पाण्याबाहेर काढून बोर्ली आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथून अधिक उपचारांसाठी अलिबाग जिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची नोंद मुरुड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
दरम्यान, सध्या नाताळच्या सुट्टीमुळे मुरुड तालुक्यात पर्यटकांची संख्या वाढली असून समुद्रकिनारेही फुलून गेलेले आहेत. भरतीच्यावेळी अनेक पर्यटक हे पाण्यात आनंद लुटत आहेत. पण अनेकदा पाण्याचा अंदाज न आल्याने अशा दुर्घटना घडत असल्याचे निदर्शनास येत आहेत.