पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ हा सराईत गुन्हेगारांपैकी एक गुन्हेगार आहे. एका गावच्या जत्रेत भरवलेल्या कुस्तीच्या मैदानात निलेश घायवळवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुस्तीच्या फडात अशाप्रकारे कुख्यात गुंडावरच हल्ला झाल्याने घटनास्थळी खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील घायवळ टोळीचा म्होरक्या आणि कुख्यात गुंड निलेश घायवळ हा धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील आंदरूड गावात जत्रेनिमित्त आला होता. तो या जत्रेत भरवलेल्या कुस्तीच्या मैदानात पहिलवानांना भेटण्यासाठी गेला असता त्याच्यावर अचानक हल्ला करण्यात आला. हा हल्ला एका पहिलवानानेच केल्याची माहिती समोर आली आहे. कुस्तीचा आखाडा रंगला असताना कुख्यात गुंडावर झालेल्या हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली.या हल्ल्याचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल होत आहे.हल्ला करणारा व्यक्ती हा अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड गावचा पहिलवान असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान भूम तालुक्यातील आंदरुड गावात ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्ताने गावात कुस्तीचा फड भरवला होता. प्रसिद्ध कुस्तीपटू थापाची कुस्ती सुरू असल्याने कुस्तीच्या मैदानाजवळ कुस्तीप्रेमींनी गर्दी केली होती. याच गर्दीचा फायदा घेत, अचानक निलेश घायवळवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.