पुणे : पुणे शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. शहरातील मध्यभाग, उपनगर, पेठासह आता पीएमपी बसस्थानकात ही प्रचंड वाहतूक कोंडी वाढली आहे. त्यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मात्र आता वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी विधानसभेमध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी तोडगा मांडला आहे. यामध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की, शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच पुणेकर आता सुटकेचा श्वास घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुणे शहरातील वाहतूक कोंडीने पुणेकरांना जीव मुठीत धरावा लागत आहे.त्यामुळे पुणेकर अक्षरश : वैतागले असून त्यांचा श्वास वाहतूक कोंडीत घुसमटत आहे. आता पुणे शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. तसेच पुणे शहरात वाहतूक सुरळीत करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित वाहतूक सिग्नल प्रणाली विकसित करणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली आहे.
पुणे शहरात वाहतूक व्यवस्थापनासाठी अतिरिक्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासंदर्भातही निर्णय घेतला जाईल अशी माहिती गृहराज्यमंत्री यांनी विधानसभेत दिली. तसेच दारू पिऊन वाहन चालवण्यावर अधिक लक्ष ठेवण्यासाठी वाहतूक विभाग आणि पोलिस यंत्रणेचा समन्वय वाढवण्यात येणार आहे. त्याचबरोबर शहरातील वाहतूक नियमन, स्पीड ब्रेकर, अपघात प्रवण ठिकाणावर उपाययोजना आणि अपघात होत असलेल्या ठिकाणी स्पीड ब्रेकर, सिग्नल सिस्टीम आणि सुरक्षात्मक उपाय करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे पुणेकरांचा वाहतुकीचा प्रश्न आता लवकरच मिटणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.