पुणे: जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पालकांचे नुकसान टाळण्यासाठी अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. शिक्षण विभागाकडून तेरा शाळांची नावे जाहीर केली असून, या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये असे आवाहनही आले आहे. तर अनधिकृत शाळांनी जर शाळा सुरू ठेवली, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा इशारा प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी बुधवारी (दि.८) दिला.
नवीन शैक्षणिक वर्षात खासगी शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पालकांचा खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्याचा ओढा असतो. अनेकदा शाळा अनधिकृत की अधिकृत याची माहिती नसल्याने पालकांची फसगत होते. त्यानंतर शिक्षण विभागाकडून त्या शाळेवर कारवाई झाल्यास पाल्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे शिक्षण विभागाकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
नाईकडे म्हणाले, ‘पालकांनी पाल्याला प्रवेश घेताना कुठल्याही अनधिकृत शाळेत प्रवेश घेऊ नये. पालकांनी शाळेला मान्यता, प्रथम मान्यता, यु डायस, स्वमान्यता आहे की नाही याची खात्री करावी. त्याचबरोबर अनधिकृत शाळा जर संस्थांनी सुरू ठेवली, तर प्रत्येक दिवशी दहा हजार रुपये दंड वसूल केला जाईल. शिवाय पालकांची फसवणूक केली म्हणून कायदेशीर कारवाई ही केली जाईल. अनधिकृत शाळा या तातडीने बंद कराव्यात. इरादापत्र आणि ज्या शाळांनी स्थलांतराचे प्रस्ताव पाठवले आहेत, अशा शाळांनी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी मान्यता घेणे बंधनकारक आहे.’
तेरा अनधिकृत शाळांची नावे
१) श्रीनाथ इंग्लिश मीडिअम स्कूल, वीर, पुरंदर
२) जिजस काईस्ट इंग्लिश मीडिअम स्कूल, कामशेत
३) किंग्ज वे पल्बीक स्कूल, लोणावळा
४) शिव समर्थ इंग्लिश मीडिअम स्कूल, जांभुळवाडी
५) एंजल इंग्लिश मीडिअम हायस्कूल गणेश नगर, दत्तवाडी नेरे
६) चाणक्य ज्युनिअर कॉलेज, पिरंगुट
७) अंकुर इंग्लिश मीडिअम स्कूल, मारुजी
८) पेरिविंकल इंग्लिश मीडिअम स्कूल, पिरंगुट
९) इलाईट इंटरनॅशनल स्कूल, कासार आबोली
१०) संस्कार प्रायमरी स्कूल इंग्लिश मीडिअम स्कूल, पिरंगुट
११) राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासारआंबोली
१२) दिल्ली पब्लिक स्कूल, हिंजवडी
१३) मॅरेथॉन इंटरनॅशनल स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, मांजरी