Pune Weather : सासवड, (पुणे) : राज्यभरात वैशाखाच्या उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून पुणे जिल्ह्यातही उष्णतेने नागरिक हैराण झाले आहेत. अशातच पुरंदर तालुक्यातील जेऊर परिसरातून उष्माघातामुळे आणखी एका मृत्यूची धक्कादायक घटना समोर आली आहे. तीव्र उन्हामुळे एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याने परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे. Pune Weather

बाबुराव दुष्यंत जाधव (वय 62, रा. जेऊर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते नेहमीप्रमाणे सकाळी आपल्या शेळ्या-मेंढ्या चारण्यासाठी जेऊर-मांडकी कॅनॉल परिसरातील शेताकडे गेले होते. सकाळी अकराच्या सुमारास तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने उकाडा प्रचंड वाढला होता. याचदरम्यान बाबुराव जाधव यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि काही वेळातच ते शेतात कोसळले. Pune Weather

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्यांना उपचारासाठी जवळच्या दवाखान्यात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक तपासणीत उष्माघाताची लक्षणे आढळल्याची माहिती डॉक्टरांनी दिली असून मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. Pune Weather
दरम्यान, राज्यात उष्णतेची लाट कायम असून दुपारच्या वेळेत नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. शेतकरी, मजूर आणि जनावरे चारण्यासाठी बाहेर पडणाऱ्यांना विशेषतः मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याचा इशारा दिला आहे. Pune Weather
प्रशासनाकडून नागरिकांना दुपारच्या उन्हात बाहेर पडणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुरेसे पाणी पिणे, डोक्यावर संरक्षण वापरणे आणि उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास तातडीने वैद्यकीय मदत घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. Pune Weather






