Pune Traffic : स्वारगेट परिसरातील केशवराव जेधे चौकातून सारसबागेकडे जाणारा भुयारी मार्ग तीन दिवसांसाठी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत असल्याने वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे पुणे महानगरपालिकेकडून तातडीने दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली आहेत.

जेधे चौक ते सारसबाग या भुयारी मार्गाची वाहतूक शुक्रवार, 7 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजल्यापासून बंद करण्यात आली आहे. ही कामे रविवार, 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. या कालावधीत या मार्गावरून सर्व प्रकारची वाहतूक बंद राहील. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून गैरसोय टाळावी, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून भुयारी मार्गाच्या भिंतींमधून पाणीगळती होत होती. या गळतीमुळे मार्गात पाणी साचत होते आणि वाहनचालकांना घसरून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला होता. परिस्थिती लक्षात घेऊन महापालिकेने भुयारी मार्गाच्या भिंतींची दुरुस्ती, गळती थांबवणे आणि जलनिस्सारणाची व्यवस्था सुधारण्यासाठी काम सुरू केले आहे. प्रशासनाने पुढील तीन दिवसांत ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे.
दरम्यान, स्वारगेट आणि शंकरशेठ रोड परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांकडून पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे. शंकरशेठ रस्त्यावरून येणाऱ्या वाहनचालकांना भुयारी मार्ग टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांनी डाव्या बाजूच्या रस्त्याने जेधे चौकात प्रवेश करून तेथून सारसबागेकडे वळावे, असे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी सांगितले.
वाहतूक विभाग आणि पुणे महानगरपालिका यांनी संयुक्तपणे नागरिकांना सुरक्षित आणि सुरळीत प्रवासासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतरच मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. पुणेकरांनी या काळात संयम बाळगून पर्यायी मार्गांचा वापर करावा, अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे.







