पुणे : स्वारगेट बस स्थानकातील अत्याचाराच्या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याचबरोबर सुरक्षात्मक यंत्रणेचा अभाव ही मोठ्या प्रमाणात दिसून आला. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आयुर्मान संपलेल्या आणि नादुरूस्त अशा ७२ ‘शिवशाही’ आणि ‘शिवनेरी’ बस मोडीत काढण्याचा निर्णय पुणे ‘एसटी’ विभागाने घेतला आहे.
केंद्र सरकारच्या मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन मधील एजन्सीमार्फत या नादुरूस्त बससाठी बोली लावण्यात येणार आहे. शुक्रवारी 21 मार्चला या दोन्ही नादुरुस्त बसचा लिलाव करण्यात येणार आहे. नादुरूस्त बसच्या माध्यमातून अडीच ते तीन कोटी रुपये प्राप्त होण्याचा अंदाज महामंडळाकडून व्यक्त करण्यात आला आहे आहे.पुणे विभागीय कार्यालयाच्या परिसरात एसटी महामंडळाच्या ७२ ‘शिवशाही’ आणि ‘शिवनेरी’ बस गेल्या वर्षभरापासून अडगळीत पडून आहेत. या बसमुळे मोठ्या प्रमाणात जागा व्यापली असून बसमधील साहित्याची चोरी देखील होत आहेत. आता या नादुरुस्त बस भंगारात काढण्याचा निर्णय एस टी महामंडळाकडून घेण्यात आला आहे.
स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर बलात्काराच्या घटनेनंतर सुरक्षात्मक यंत्रणेचा अभाव समोर आला. नादुरूस्त बसचा गैरवापर होत असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील सर्व बस स्थानकातील आयुर्मान संपलेल्या आणि नादुरूस्त बस १५ एप्रिलपर्यंत मोडीत काढण्याचे निर्देश दिले आहेत.