लोणी काळभोर : पुणे – सोलापूर महामार्गावरील कवडीपाट टोल नाका ते कासुर्डी या दरम्यान रस्त्याच्या मध्यभागापासुन दोन्ही बाजुकडील १५ मीटर (सुमारे पन्नास फुट) अंतराच्या आतील सर्व प्रकारची अतिक्रमणे काढण्यास सोमवारी (ता. १४) अतिक्रमण विरोधी पथकाने जोरदार सुरूवात केली आहे.
मात्र, एकदा अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी अतिक्रमण होऊ नये म्हणून कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना प्रशासनाकडून करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा या ठिकाणी काही व्यावसायिक रस्त्याच्या कडेला दुकाने थाटण्याच्या तयारीत आहेत.
पुणे-सोलापूर महामार्गावरील पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती, लोणी स्टेशन, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, व उरुळी कांचन परिसरात अतिक्रमणांची संख्या मोठी असल्याने हि कारवाई मागील पंधरा दिवसापसुन टोलनाका येथून सुरुवात झाली आहे. हि कारवाई अत्यंत संथ गतीने आहे.
तर काही धनदांडग्याची मात्र अतिक्रमणे अजूनही हटविली नाहीत. कारवाई थांबविण्यासाठी कोणताही राजकीय हस्तक्षेप चालत नसल्याचा अनुभव काहींना आला. त्यामुळे परिसरात सध्या साऱ्यांनीच अतिक्रमण स्वतःहून काढण्यास सुरुवात केली आहे. वाढलेली अतिक्रमणे हटविल्याने महामार्ग रुंदीकरणासही सेवा रस्ते विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ही मोहीम राबविताना महामार्गाच्या बाजूला अतिक्रमण काढल्यानंतर पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याची काळजीही घेणे अतिक्रमण विरोधी पथकाने आवश्यक होती. मात्र, तसे होत नसल्याने रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यानंतर त्याच ठिकाणी पुन्हा दुकाने थाटली जात आहे.
त्यामुळे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांचा ताफा, जेसीबसह कंत्राटदार कंपनीची वाहने आणि कर्मचारी व त्यांच्यावर प्रशासन करीत असलेला खर्च व्यर्थ जाताना दिसत आहे. अतिक्रमण काढल्यानंतर त्याजागी पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, पुणे-सोलापूर महामार्गावरील कवडीपाट टोल नाका ते कासुर्डी या दरम्यान, रस्त्याच्या मध्यभागापासुन दोन्ही बाजुकडील १५ मिटर (पन्नास फुट) अंतराच्या आतील सर्व प्रकारची अतिक्रमणे हटविली जाणार असल्याबाबतची नोटीस एक महिन्यांपूर्वी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने वर्तमानपत्रात दिली होती.
यात अतिक्रमणधारकांनी अतिक्रमणे स्वतःहुन न हटविल्यास, अतिक्रमन कारवाईचा खर्च अतिक्रमण धारकांच्याकडुन वसुल करण्यात येणार असल्याचे नोटीसीत नमुद केले होते. एखाद्या अतिक्रमण धारकांने खर्च देण्यास नकार दिल्यास, तो खर्च संबधितांच्या सातबारावर चढविला जाणार आहे. तर या मोहीमेला विरोध केल्यास, संबधितावर पोलिस कारवाई केली जाणार असल्याचेही एनएचएआयने स्पष्ट केले आहे.
पार्किंगच्या जागा मोकळ्या होणार का?
पुणे – सोलापूर महामार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला व महामार्गावर कुठेही पार्किंगची व्यवस्था नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूला फळविक्रेते, व्यवसायिक, हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्यांनी ठाण मांडले आहे.
तसेच कदमवाकवस्ती (लोणी स्टेशन), लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत मुख्य रस्त्यांवरच वाहने लावलेली दिसतात. सध्या शहरात अतिक्रमण निर्मुलन मोहीम सुरू आहे.
व्यावसायिकांची उडाली धावपळ..!
अतिक्रमण मोहीम सुरू होताच काही छोट्या मोठ्या व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली. या मोहिमेला व्यावसायिकांचा विरोध झाला नसला तरी टपऱ्या सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी व्यावसायिक धावपळ करीत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.