पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसून येत आहे. अशातच आता पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने पुणे हादरलं आहे. पुण्यातील कात्रज घाटात गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघांकडून फायरिंग करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. एका हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका वॉर्डबॉयवर फायरिंग करण्यात आली आहे. दीपक लोकर याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. या घटनेत दीपक जखमी झाला आहे. घटनास्थळावरून पिस्टल जप्त करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दीपक लोकर हा साताऱ्यातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये काम करणारा तरुण आहे. त्याला कात्रज घाटात आणण्यात आलं अन् त्यावेळी त्याच्यावर फायरिंग करण्यात आली. त्याच्यावर गोळीबार का झाला? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. त्याच्या छातीत गोळी लागल्याचं समजत आहे. या घटनेनंतर त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. पोलिसांच्या तपासात एक पिस्तुल देखील सापडलं आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दोन अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाने अटक केली होती. कात्रज बाह्यवळण मार्गावर ही कारवाई करण्यात आली होती. त्याच्याकडून पिस्तूल आणि एक काडतूस जप्त करण्यात आलं होतं.