पुणे : पुण्यातील ससून रुग्णालय गेल्या काही दिवसापासून कोणत्या ना कोणत्या कारणावरून चांगलंच चर्चेत आहे. ड्रग्सची तस्करी असो वा रुग्णालयातील सतत लिफ्ट बंद पडण्याचे प्रकार असो. अशातच आता पुन्हा एकदा ससून चर्चेत आल्याचं पाहायला मिळत आहे. रुग्णालयात तीन आठवडा पुरेल इतकाच सलाईन साठा शिल्लक आहे. बाजारपेठांमध्ये सलाईनच्या बाटल्यांचा तुटवडा असल्याने पुरवठा कमी असल्याचा दावा ससून रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आला आहे. (Sassoon Hospital)
दरम्यान, ससून रुग्णालयासाठी आवश्यक असणार्या औषध खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून अद्याप निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही. नांदेड घटनेनंतर डीपीसीकडून निधी देण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, शासकीय रुग्णालयांना औषधं खरेदी करून देण्यासाठी नवीन औषध खरेदी प्राधिकरणाचेही कामकाज सुरू झालं नसल्याने आणि डीपीसीमधून निधी न मिळाल्याने परिणामी ससूनमधील औषधांचा साठा संपत आला असून, रुग्णालयात प्रामुख्याने 100 मिलिमीटर क्षमतेच्या सलाईनच्या बाटल्यांचाही साठा संपण्याच्या मार्गावर आहे. (Saline shortages)
ससून रुग्णालय प्रशासनाची धावपळ
बाजारपेठांमध्ये सलाईनचा तुटवडा असल्याने पुरवठा कमी असल्याचा दावा ससून प्रशासनाकडून करण्यात आला आहे. त्यामुळ वेळेत पुरवठा व्हावा यासाठी ससून रुग्णालयाची धावपळ सुरु आहे. रुग्णालयात सलाईन उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाकडून स्थानिक पातळीवर सलाईन खरेदी करण्यात येणार असल्याची योजना आहे. रुग्णालयात तीन आठवडा पुरेल इतकाच सलाईन साठा शिल्लक असल्यामुळे रुग्णालय प्रशासनाची धावपळ सुरु झाली आहे.