पुणे : पुण्यातील देहू नगरीत वारकऱ्यांचा मेळा जमला आहे. कारण जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 339 वा पालखी सोहळा आज पार पडणार आहे. या पालखी सोहळ्यासाठी संस्थानच्यावतीने नवी वेलवेटची छत्री बनविण्यात आली आहे.
संस्थानसाठी ही छत्री पुण्यातील भवानी पेठ येथील विठ्ठल मंदिराचे सेवेकरी राजेश भुजबळ व त्यांच्या मित्र मंडळींनी चेन्नई येथून तुकोबारायांच्या पालखीवर सावली धरण्यासाठी खास तयार करून घेतलेली आहे. ही छत्री श्री संत तुकाराम महाराजांच्या चरणी अर्पण करण्यासाठी चेन्नई येथील विशेष कारागिरांकडून तयार करून घेतली आहे. यासाठी वेलवेटचे कापड वापरण्यात आले आहे. या छत्रीवर हाताने संपूर्ण कारागिरी केलेली आहे. यामुळे यंदा पालखीसोहळ्यात ही छत्री लक्षवेधी ठरणार आहे.
या छत्रीचे वैशिष्ट्य म्हणजे या छत्रीवर शंख, चक्र, तिलक (गंध), गरूड, हनुमान यांची चित्र हातकामाने केलेली आहे. इतर भागात सुरेख नक्षीकाम केलेले आहे. छत्रीसाठी लागणा-या काड्या नैसर्गिक बांबूच्या चिमट्यांपासून बनविलेल्या आहेत. छत्रीच्यावर पितळी कळस बसवण्यात आला आहे.