पुणे : राज्यासह पुण्यातही दुचाकी वाहनाची खरेदी केल्यानंतर खरेदीदाराला वाहन वितरकाला दोन हेल्मेट द्यावी लागणार आहेत. राज्याच्या परिवहन विभागाने याबाबतचा निर्णय बंधनकारक केला आहे. वितरकाला आता या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे. तसेच वाहनचालकांकडून हेल्मेटसाठी जास्तीचे पैसे आकारू नये, असे बजावले आहे. अन्यथा, हेल्मेट न दिल्यास संबंधित वाहन वितरकावर कठोर कारवाई केली जाणार आहे. आता पुणे आरटीओ कार्यालयानेदेखील याबाबत पत्र काढले असून, सर्व वाहन वितरकांना आदेश दिले आहेत. विक्रेत्यांनी हेल्मेट न दिल्यास संबंधित विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार आहे, असे पुणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी सांगितले.
परिवहन विभागाने याबाबतचा शुक्रवारी आदेश काढला आहे. दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत आहे. यामध्ये दुचाकी चालकांचे प्रमाण जास्त आहे. वाहनचालकाला हेल्मेट न दिल्यास कारवाई करण्याचीही तरतूद केली आहे. वाढत्या अपघातांची संख्या पाहता न्यायालयानेदेखील याबाबत आदेश दिलेले आहेत. त्यामुळे दुचाकी वाहन खरेदी केल्यानंतर संबंधित खरेदीदाराला दोन हेल्मेट देण्याबाबत मोटर वाहन कायद्यामध्ये तरतूद करण्यात आली आहे. पुणे शहरात घडलेल्या अपघातांमध्ये दुचाकीस्वाराला झालेल्या अपघातात बहुतांश वेळा हेल्मेट नसल्याने जीव गमवावा लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. अशा प्रकारच्या अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे न्यायालयानेदेखील चिंता व्यक्त केली आहे. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी हेल्मेटसक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत.
अन्यथा विक्रेत्याचे ट्रेड सर्टिफिकेट रद्द होणार
राज्याच्या परिवहन विभागाने वाहन विक्रेत्याने दुचाकी खरेदीदाराला दोन हेल्मेट देणे बंधनकारक केले आहे. मात्र यासाठी वितरकाला खरेदीदाराकडून कोणत्याही प्रकारची जास्तीची रक्कम घेता येणार नाही. या नियमाचे उल्लंघन करून खरेदीदाराकडून हेल्मेटसाठी पैसे घेतल्यास संबंधित विक्रेत्याचे ट्रेड सर्टिफिकेट रद्द करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.