पुणे : पुणे शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. या वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांना नाहक मनस्तापही सहन करावा लागत आहे. आता पुणे महानगर परिसरातील कोंडी कमी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शिरूर-खेड-कर्जत- पनवेल असा नवीन रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळे आता लवकरच पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी याबाबत माहिती देताना असे सांगितले की, शिरूर -खेड- कर्जत -पनवेल असा नवीन रस्ता प्रस्तावित करण्यासाठी १२ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या रस्त्यामुळे पुणे शहराबरोबरच शिक्रापूर-चाकण-तळेगाव रस्त्यावरील वाहतूक कोंडी संपणार आहे. वाहतुकीत सुधारणा करण्यासाठी हा प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा झाली आहे. हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी आठवडाभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात येईल. असं त्यांनी म्हटल आहे.
दरम्यान हा प्रकल्प १२ हजार कोटी रुपयांचा असून, ‘तो बांधा वापरा व हस्तांतरित करा’ या तत्त्वावर राबविला जाणार आहे; तसेच द्रुतगती मार्गावरील वाहतुकीचा भारदेखील कमी होणार आहे. हा प्रकल्प १३५ किलोमीटर लांबीचा असून, तो चार पदरी प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे सरकारवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. त्यामुळे पुणेकरांना आता वाहतूक कोंडीतून लवकरच मुक्तता मिळणार आहे