पुणे : संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरलेल्या पुण्यातील कल्याणी नगर अपघात प्रकरणी आता रोज नवीन आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. या अपघात प्रकरणात पुणे शहर पोलीसांनी रविवारी न्यायालयात सांगितले की, ससून हॉस्पिटलमधून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने गोळा करण्यात आले. आणि त्याच्या आईच्या रक्ताचे नमुने घेतले तेव्हापासूनची सर्व माहिती उघड झाली आहे. त्याचबरोबर या प्रकरणात आणखी काही संशयित त्याठिकाणी उपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे.
अल्पवयीन मुलाच्या रक्ताचा नमुना घेतला त्या दिवशीचे ससून रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त केले आहे. विशाल अग्रवाल यांच्या सांगण्यावरून ससूनच्या आपत्कालीन विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांनी शिवानी अग्रवाल यांचे रक्त घेतल्याचे समोर आले.
अपघातातील अल्वयीन आरोपी हा रक्त देण्यासाठी रुग्णालयात आला तेव्हा तो आलिशान कारमध्ये आला होता, तेव्हा त्या कारमधून तीन व्यक्ती तिथे पोहोचले होते. रक्तनमुना घेईपर्यंत ते व्यक्ती तेथे उपस्थित होते. ते व्यक्ती कोण याबाबतही पोलिसांकडून तपास केला जात असल्याचे पोलीसांनी न्यायालयात सांगितले होते.
आरोपीचे वडिल विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवाल यांच्या रक्ताचा नमुना घेऊन ‘डीएनए’ तपासणीसाठी पाठवायचा आहे. तसेच रक्ताचा नमुना घेतलेल्या दिवशी रुग्णालयातील सीसीटीव्ही मध्ये काही संशयित दिसत असून, आणखी काही आरोपींचा सहभाग निष्पन्न होण्याची शक्यता असल्याचे तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात सांगितले आहे