Pune Politics: महापालिका निवडणुकीची चाहूल लागताच शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. विविध पक्षांकडून इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज देण्यास सुरुवात झाली असून मतदारसंघनिहाय बैठका, समीक्षणे आणि रणनीती आखणीचे कार्यक्रम जलद गतीने सुरू झाले आहेत. (latest political news)

महायुतीमध्ये नगरपरीषद व नगर पंचायतीच्या निवडणुकांदरम्यान दिसून आलेल्या नाराजीचा परिणाम भाजपमध्येही जाणवत आहे. घटक पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रवेश दिल्याने निर्माण झालेल्या असंतोषानंतर महायुतीने असे प्रवेश थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या ‘मिशन 125’ची पुढील दिशा काय राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजप कार्यकर्त्यांचा सवाल
भाजपमध्ये इतर पक्षांतील माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे पक्षातील मुळ कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढली आहे. ज्यांच्या विरोधात आम्ही लढलो, त्यांचाच आता प्रचार करायचा का? असा सवाल इच्छुक कार्यकर्ते पक्ष श्रेष्ठींना करू लागले आहेत.
काँग्रेस पक्षाने निवडणूक तयारीचा धडाका सुरू केला असून पुणे शहर जिल्हा काँग्रेसकडून ब्लॉकनिहाय आढावा बैठका आयोजित केल्या जात आहेत.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही निवडणूक प्रक्रियेला गती दिली असून 8 ते 18 डिसेंबरदरम्यान आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून विहित नमुन्यातील उमेदवारी अर्ज मागविण्यात येत आहेत, अशी माहिती समोर आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनेही इच्छुक उमेदवारांकडून अर्ज विक्री व स्वीकृती प्रक्रिया गत आठवड्यात जाहीर केली आहे.
महापालिका निवडणुकीच्या तयारीत सर्वच पक्षांनी उमेदवारी इच्छुकांची माहिती अर्जाच्या माध्यमातून गोळा करण्यास सुरुवात केल्याने पुण्यातील राजकीय वातावरण आणखी रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.






