पुणे : निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त सुभाषचंद्र डांगे यांचे रविवारी (ता.६) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने पोलीस दलातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुण्याचे डॅशिंग पोलीस अधिकारी व वृक्षप्रेमी म्हणून डांगे यांची ओळख होती. मनमिळावू स्वभावामुळे विविध क्षेत्रातील लोकांशी दांडगा जनसंपर्क होता. त्यांच्याकडून क्लिष्ट गुन्ह्यांचा तत्काळ छडा लावण्याची हातोटी होती.
सुभाषचंद्र डांगे हे सहाय्यक पोलीस आयुक्त या पदावरून निवृत्त झाले होते. निवृत्त झाल्यानंतर डांगे हे पुण्यातील निवासस्थानी राहत होते. त्यांना रविवारी (ता.६) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला. त्यांना उपचारासाठी तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
दरम्यान, सुभाषचंद्र डांगे यांच्या पार्थिवावर कात्रज येथील स्मशानभूमीत आज सोमवारी (ता.७) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.