पुणे- राज्यातील तीन कोटी ग्राहकांना अहोरात्र मेहनत घेऊन सेवा देणाऱ्या वीज तांत्रिक कामगारांना चांगली पगारवाढ मिळावी यासाठी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, त्यांच्यासमवेत चर्चा करणार आहे. वीज तांत्रिक कामगारांच्या पगारवाढीबरोबरच, त्यांच्या इतर समस्याही सोडविण्यासाठी “संचालक” या नात्याने काम करणार असल्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे संचालक विश्वास पाठक यांनी दिले.
येरवडा येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिरात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब भाकरे होते. यावेळी महावितरणचे संचालक अरविंद भादीकर, महानिर्मितीचे संचालक एस. एम. मारुडकर, महापारेषणचे संचालक सुगत गमरे, महावितरण कंपनीचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, मुख्य अभियंता राजेंद्र पवार, महापारेषणचे मुख्य अभियंता अनिल कोळप, भारत पाटील, महानिर्मितीचे मुख्य अधिकारी पी. एल. वारजूरकर, संयोजक हाजी सय्यद जहिरोद्दीन, स्वागताध्यक्ष बाळासाहेब सायकर व कार्यशाळा प्रमुख अपसरपाशा सय्यद आदी उपस्थित होते.
पाठक म्हणाले, ”तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 2018 मध्ये पाच वर्षांसाठी वीज तांत्रिक कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिली होती. हे वर्ष पगारवाढीचे असून, आताचे सरकार शिंदे-फडणवीस यांचे असून, ऊर्जामंत्री फडणवीसच आहेत. त्यामुळे पगारवाढीचा निर्णय लवकरच होईल”.
तसेच महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या तीनही संस्थांतील आपण सर्वजण वीज पुरवतो. आज राज्याला 28 हजार मेगावॅट वीजनिर्मितीची गरज असून, त्यातील 10 हजार मेगावॅट वीज आपण पुरवत आहोत. कामगार चळवळीची गरज आहे, पण आपल्या मर्यादा ओलांडल्या जाणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, अरविंद भादीकर, एस. एम. मारुडकर, सुगत गमरे, अंकुश नाळे, राजेंद्र पवार, अनिल कोळप, भारत पाटील, पी. एल. वारजूरकर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. तर संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष बाळासाहेब सायकर यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.