पुणे: जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि विशेषतः खंडाळा (Pune News) घाटाच्या धोकादायक वळणांवर काही दुचाकीस्वार सातत्याने जीवघेणे स्टंट करत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. हे बायकर्स वाहतुकीचे सर्व नियम मोडत भरधाव वेगाने स्टंट्स करत आहेत, ज्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.

बायकर्स तरुण सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी धोकादायक स्टंट करतात. कायद्याने हे अत्यंत चुकीचे असतानाही पुणे परिसरातील काही दुचाकीस्वार जीवाची पर्वा न करता अशा धोकादायक कृती करताना दिसून येत आहेत. या बेजबाबदार कृत्यांमुळे मोठ्या अपघाताची शक्यता वाढली आहे.
स्टंट्समुळे इतर वाहनचालकांना अचानक ब्रेक लावावा लागतो, ज्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण होते. यामुळे बेफिकीर स्टंट्समुळे मागील काही काळात अपघातांची संख्या वाढताना दिसत आहे.
या प्रकारावर स्थानिक नागरिक आणि महामार्गाचे प्रवासी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. वाहतूक पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन, नियम मोडणाऱ्या दुचाकीस्वारांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.







