Pune News : पुणे महापालिकेने ठरवून दिलेल्यापेक्षा जास्त पाणी वापरल्यामुळे महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरणाने (MWRRA) त्यांना पुन्हा एकदा कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. प्राधिकरणाचे सचिव मल्लिकार्जुन धराने यांनी ही नोटीस दिली आहे. (Pune News )

प्राधिकरणाने २०१७ मध्ये पुण्याला वर्षाला ८.१९ TMC पाणी मंजूर केले होते. नंतर २०१८ मध्ये ही मर्यादा वाढवून ११.५० TMC इतकी केली आणि दररोज साधारण ८९२ MLD पाणीपुरवठ्याची सीमा ठरवली. पण प्रत्यक्षात महापालिका दररोज जवळपास १३५० MLD पाणी वापरत असल्याचे उघड झाले आहे.
यामुळे हवेली, दौंड आणि इंदापूर या भागांमध्ये सिंचनासाठी पाणी कमी पडत असल्याचा आरोप नोटिशीत केला आहे. प्राधिकरणाने मागील काही वर्षांत दिलेल्या सूचनांकडे आणि आदेशांकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याचेही नमूद आहे.
खडकवासला धरणातून पाणी उचलायची जबाबदारी महापालिकेकडे असूनही, प्राधिकरणाने सांगितलेल्या मर्यादेत पाणी न घेता नियम मोडल्याचे म्हटले आहे. त्यामुळे 2005 च्या प्राधिकरणाच्या कायद्यानुसार कारवाईची प्रक्रिया सुरू करण्याची वेळ आली असल्याचे नोटिशीत स्पष्ट केले आहे.
महापालिकेला एक महिन्यात प्रतिज्ञापत्र देऊन पूर्वी दिलेल्या आदेशांचे पालन कसे केले, किती प्रमाणात केले, याचे सविस्तर स्पष्टीकरण द्यायचे आहे. तसे न केल्यास दंडात्मक कारवाई होईल, असा इशारा प्राधिकरणाने दिला आहे.







