Pune News: पुण्यातील ससून रुग्णालयातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रकाश पुरोहित नावाच्या रुग्णाचा मृत्यू आठ महिन्यांपूर्वी झाला असून, त्यांचे पार्थिव ‘बेवारस’ म्हणून अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांना मात्र या काळात पुरोहित बेपत्ता असल्याचे वाटत होते.

हेही वाचा- पुण्यात गोरखधंदा! विदेशी महिला पुरवल्या अन्…; ‘कसा’ झाला भांडाफोड?
नेमकं प्रकरण काय?
भाजपाचे शहर प्रसिद्धीप्रमुख पुष्कर तुळजापूरकर यांनी आपल्या सासऱ्यांच्या प्रकाश पुरोहित यांच्या शोधासाठी ससून रुग्णालय प्रशासनाला पत्र पाठवले होते. गेल्या दोन महिन्यांपासून पुरोहित यांचा शोध सुरू असल्याचा दावा त्यांनी केला होता. प्रसारमाध्यमांनी या प्रकरणाकडे लक्ष वेधल्यानंतर ससून रुग्णालय आणि पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली.
तपासात धक्कादायक माहिती समोर आली की, पुरोहित यांना 23 सप्टेंबर 2024 रोजी ससूनमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर 4 डिसेंबर 2024 रोजी त्यांना दादासाहेब गायकवाड यांच्या संस्थेकडे सोपविण्यात आले. त्यानंतर रुग्ण बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या नातेवाइकांनी केली होती.
यानंतर गायकवाड यांनी पुरोहित यांना पुन्हा 12 फेब्रुवारी 2025 रोजी ससूनमध्ये दाखल केले. मात्र, त्यांच्या नोंदीत रुग्णाची नोंद ‘अज्ञात’ अशी करण्यात आली होती. पुढे 7 मार्च 2025 रोजी पुरोहित यांचा मृत्यू झाला. मृत देहाची ओळख न पटल्याने त्यांचे अंतिमसंस्कार ‘बेवारस मृत्यू’ म्हणून करण्यात आले.
पत्नीने फोटोवरून केली ओळख
या प्रकरणाची चौकशी वाढल्यानंतर पुरोहित यांच्या पत्नीला बंडगार्डन पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. बेवारस मृत्यूची नोंद करताना रुग्णालयाकडून घेतलेली छायाचित्रे त्यांना दाखवण्यात आली. फोटो पाहताच पत्नीने मृतदेहाची ओळख प्रकाश पुरोहित असल्याचे निश्चित केले.
या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल आता ससून रुग्णालय प्रशासनाला देण्यात येणार आहे. रुग्णाची योग्य ओळख न पटल्याने आणि नातेवाईकांना माहिती न दिल्याने रुग्णालयाची कार्यपद्धती गंभीर प्रश्नचिन्हाखाली आली आहे. वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या आदेश देण्यात आला आहे.







