Pune News: बारामती, (पुणे) : पुणे ग्रामीण पोलीस दलाने आयोजित केलेल्या 51 वी कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा 2025 दि.17 ते 21 नोव्हेंबर दरम्यान पोलीस उपमुख्यालय, बऱ्हाणपूर, बारामती येथे दिमाखात पार पडल्या. स्पर्धेच्या समारोप सोहळ्याला विविध मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती.

समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे अपर पोलीस महासंचालक व संचालक पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन, महाराष्ट्र राज्याचे दीपक शिवानंद पांडेय, तर विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र सुनील फुलारी यांनी अध्यक्षस्थान भूषविले.
हेही वाचा- Maharashtra Politics: सामनाच्या अग्रलेखातून एकनाथ शिंदेंवर जोरदार टिका, 35 आमदार हाती घेणार कमळ
समारोप प्रसंगी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, गणेश बिरादार, विविध जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक तसेच पोलीस अधिकारी-अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. याचबरोबर सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार, साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, कोल्हापूर पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनीही उपस्थिती लावली.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक यमाई हलगी ग्रुप (अकलूज) व तुषार मावळा ग्रुप (बारामती) यांच्या स्वागत वादनाने झाली. प्रारंभी पुरुष व महिला 100 मीटर धावण्याच्या रोमांचक स्पर्धा पार पडल्या. पुरुष गटात साताऱ्याचे चैतन्य मरडे तर महिला गटात साताऱ्याची गौरी सावंत प्रथम आले.
पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी प्रस्ताविक भाषणात खेळामुळे पोलीस दलातील ऐक्य, तंदुरुस्ती, सहकार्यभाव आणि मानसिक स्थैर्य वाढण्यास मदत होते असे सांगत सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी विजेत्यांचे अभिनंदन करून आगामी महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धेसाठी उत्तम तयारी करण्याचे आवाहन केले.
प्रमुख अतिथी दीपक पांडेय यांनी उत्कृष्ट आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करून परेड आणि बँड पथकाच्या शिस्तबद्ध सादरीकरणाचे कौतुक केले. या स्पर्धेत कोल्हापूर परिक्षेत्रातील 900 पुरुष व 250 महिला खेळाडूंनी 7 सांधिक व 12 वैयक्तिक अशा 19 विविध प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला. सर्व सामने अत्यंत चुरशीचे आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. पोलीस व नागरिक यांच्यात समन्वय वाढावा यासाठी स्थानिक शाळांनाही सहभागी करून घेण्यात आले.
दरम्यान,सदर स्पर्धेमध्ये पुणे ग्रामीण, कोल्हापुर, सांगली, सातारा, सोलापुर ग्रामीण व सोलापुर शहर अशा 06 संघांनी सहभाग घेतला. सदर स्पर्धेमध्ये पुरुष व महिला विभागात सर्व साधारण विजेते पद देण्यात आले आहेत. हे सर्वसाधारण विजेतेपद 207 गुणांसह सातारा जिल्हयाने पटकावून स्पर्धेचा मान आपल्या नावे केला. आभारप्रदर्शन अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी केले.
हेही वाचा– प्रेक्षकांनी खुर्च्या फेकल्या,पडदे फाडले, अन्… गौतमीच्या डान्सने राडा! कारण ऐकून व्हाल थक्क..






