अक्षय भोरडे
Pune News : तळेगाव ढमढेरे (पुणे) : कासारी (ता. शिरूर) येथील तळेगाव ढमढेरे-न्हावरा रस्त्यालगत तळेगाव ढमढेरे, कासारी, टाकळी भिमा, निमगाव म्हाळुंगी या चार गावांच्या शिवेवर असणाऱ्या ‘गणपतीमाळ’ या माळरानावरील गणेश मंदिरात कोजागिरी पौर्णिमेपासून रोज पहाटे काकड आरतीचे स्वर घुमत आहेत.
या गणेश मंदिरात गेल्या १४ वर्षांपासून काकड आरतीची परंपरा जपली जात आहे. सुमधुर अभंग गायनाने परिसरातील वातावरण भक्तीमय होत आहे. पहाटे चार वाजता काकड आरतीला सुरुवात होते. या वेळी मंदिरासमोर रांगोळी काढली जाते. गणेश मुर्तीला पंचामृताने अभिषेक करून स्नान घातले जाते. देवाला तुळसी पानांचा व फुलांचा पुष्पहार अर्पण केला जातो.
या काकड आरतीसाठी तळेगाव ढमढेरे, कासारी, माळवाडी, नरकेवाडी, टाकळी भिमा, निमगाव म्हाळुंगी, घोलपवाडी आदी परिसरातील पुरुषांबरोबर महिला व बालकवर्गही उपस्थित असतात.
महिनाभर चालणाऱ्या या काकड आरतीबरोबरच विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तुळशी विवाहाच्या दिवशी गणपती मंदिरात मोठ्या थाटामाटात तुळशी विवाह सोहळा पार पडतो. काकड आरतीची सांगता कार्तिक शु. १५ या दिवशी केली जाते. गणपती मंदिर ते होमाचीवाडी अशी दिंडी प्रदक्षिणा घातली जाते. या दिंडी सोहळ्यासही भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.