Pune News : पुणे : पान मसाला, गुटखा, सुपारी, तंबाखू असे पदार्थ चघळण्याच्या सवयीमुळे कर्करोगाच्या प्रमाणात वाढ होत आहे. संभाव्य धोके लक्षात घेऊन राज्यात गुटख्याची निर्मिती, विक्री आणि व्यसन यावर बंदी घालण्यात आली. तरिही, तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनात घट झाल्याचे आढळले नाही. याउलट गंमत म्हणून, मित्रांच्या संगतीने नशा करण्याची क्रेझ तरुणाईमध्ये वाढतच असल्याचे चित्र दिसते. अनेकदा इमारतींचे वाहनतळ, लिफ्ट एवढेच नव्हे तर कार्यालयांच्या भिंतीदेखील गुटखा खाऊन थुंकणाऱ्यांच्या तावडीतून सुटत नाहीत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता खासगी कार्यालयातदेखील तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसे आढळल्यास दंड ठोठावण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने हे आदेश जारी केले आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागाचे आदेश जारी
सध्या शासकीय, निमशासकीय कार्यालयात तंबाखूजन्य पदार्थ वापरास बंदी आहे. त्याचप्रमाणे आता नवीन आदेशानुसार खासगी कार्यालये व उपहारगृहांमध्ये देखील तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ वापरावर बंदी घालण्यात आली आहे. नियम न पाळल्यास २०० रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. (Pune News) ‘स्वच्छ भारत, स्वस्थ भारत’ अभियान महाराष्ट्रात राबवण्याचा निर्णय झाला आहे. त्याअंतर्गत नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदार व्यक्तीची नेमणूक करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तंबाखूमुक्त परिसर करण्याचे शासनाने आदेश दिले आहेत.
सार्वजनिक ठिकाणी ज्यामध्ये शासकीय, निमशासकीय कायालये, खाजगी कायालये, शासकीय संस्था, कार्यालयातील कामाची जागा, उपहारगृहे, शाळा व महाविद्यालये यांचा समावेश होतो. (Pune News) तेथे नागरिकांच्या संरक्षणाकरीता सिगारेट, तंबाखू व तंबाखूजन्य इतर उत्पादने प्रतिबंधक कायदा २००३ च्या कलम-४ अन्वये तंबाखू खाणे, थुंकणे, धूम्रपान करण्यास प्रतिबंध आहे. शासकीय इमारतीच्या परिसरामध्ये धूम्रपान आणि थुंकणे हा दंडात्मक गुन्हा आहे.
राज्यात राबवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत एकूण ४०४ तंबाखूमुक्त केंद्रे असून, येथे ४ लाख तंबाखू खाणाऱ्यांची संख्या नोंदली गेली आहे. मात्र, तंबाखूमुक्तीच्या मार्गाने जाणाऱ्या नागरिकांचे प्रमाण फार क्वचितच आढळत असल्याचे जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्ताने समोर आले आहे. (Pune News) भारतात आणि महाराष्ट्रात प्रामुख्याने ग्रामीण भागात वेगवेगळ्या प्रकारे तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केले जाते. तंबाखूचे सेवन केल्याने तोंडाचा कर्करोग होतो आणि संपूर्ण जगात भारत देशात सर्वाधिक मुख कर्करोगाचे रोगी आढळून आलेले आहेत.
भारतात २८.६ टक्के प्रौढ; तर राज्यात प्रौढ व्यक्तीचे तंबाखू सेवन करण्याचे प्रमाण जवळपास २६.६ टक्के आहे. राज्यात जवळपास ५.१ टक्के युवक (१३ ते १५ वयोगट) हे तंबाखूचे सेवन करत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने ३१ मे २००८ पासून कोणत्याही माध्यमात तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिरातींवर पूर्णपणे बंदी घातली आहे; मात्र, आजही तंबाखूची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.
तंबाखूच्या सेवनाने बरेच असंसर्गजन्य आजार निर्माण होतात. उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग आणि तोंडाचा कर्करोग होतो. भारतातील तंबाखू नियंत्रणाच्या अहवालानुसार, भारतात प्रतिवर्षी तंबाखूजन्य पदार्थाच्या व्यसनामुळे ८ ते ९ लक्ष लोकांचा मृत्यू होतो. त्यापैकी ७ दशलक्षाहून अधिक मृत्यू थेट तंबाखूच्या वापरामुळे होतात.
केंद्र सरकारने २००३ मध्ये केंद्रीय तंबाखू नियंत्रण कायद्यान्वये त्याच्या आहारी जाणाऱ्यांना रोखण्यासाठी कडक पावले उचलली. कायद्याच्या भिंती मजबूत करण्याचा प्रयत्न केला. २००७-२००८ मध्ये सरकारने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबवणे सुरू केले, जेणेकरून व्यसनापासून उगवती पिढी दूर राहील. (Pune News) शाळांच्या शंभर मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली गेली. जाहिरातींना पायबंद घातला. मात्र, आजदेखील तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी गेलेल्यांची संख्या कोटींमध्ये आहे. देशातील एकूण मृत्यूच्या १० टक्के मृत्यू तंबाखूजन्य पदार्थांमुळे होत आहेत. याला या नियमामुळे पायबंद बसेल, अशी अपेक्षा आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : जीवे मारण्याच्या धमकीनंतर छगन भुजबळ माध्यमांशी बोलले; म्हणाले, पवार कुटुंब…
Pune News : लवकरच मंत्रिमंडळ विस्तार; पुणे जिल्ह्याला किती मंत्री मिळणार?