Pune News : ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे होणार आहे. साने गुरुजी यांच्या कर्मभूमीत होणाऱ्या या संमेलनासाठी अध्यक्षाची निवड जाहीर झाली आहे. रविवारी पुण्यात झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत डॉ. रवींद्र शोभणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. शोभणे हे कथाकार, कादंबरी लेखक आणि समीक्षक आहेत.(Pune News)
९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे होणार आहे.
प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, जेष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, जेष्ठ बाल साहित्यिक न. म. जोशी, जेष्ठ समीक्षक बाळकृष्ण कवठेकर यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत होती. त्यातून अखेर शोभणे यांची बहुमताने निवड करण्यात आली. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे या आज पुण्यात साडेतीन वाजता पत्रकार परिषद घेऊन डॉ. शोभणे यांच्या नावाची घोषणा करणार आहेत. (Pune News)दरम्यान, याच बैठकीत संमेलनाच्या तारखांवरही विचार झाला असून, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात संमेलनाचे आयोजन होण्याची शक्यता आहे.(Pune News)
शोभणे यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये उत्तरायणसाठी महाराष्ट्र फाऊंडेशनचा (अमेरिका) पुरस्कार, उत्तरायणसाठी मारवाडी प्रतिष्ठानचा घनश्यामदास सराफ पुरस्कार, उत्तरायण’साठी विदर्भ साहित्य संघाचा पु. य. देशपांडे कादंबरी पुरस्कार, सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ जळगाव आयोजित राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.(Pune News)