Pune News : पतंग उढविण्यासाठी घराबाहेर पडलेल्या 11 वर्षीय मुलाचा रेल्चेच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. हडपसर मधील ससाणेनगर परिसरात लोहमार्ग ओलांडत असताना ही दुर्घटना घडली. (Pune News)

प्रकाश डबले भूल (वय -11, मूळ रा. नेपाळ) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. प्रकाश हा कुटुंबीयांसोबत ससाणेनगमधील गीतगंधर्व सोसायटीत राहायला होता. त्याची आई घरकाम करते, वडील रखवालदार म्हणून काम करतात. बुधवारी (ता. 10) सायंकाळी प्रकाश पतंग उडविण्यासाठी घरातून बाहेर पडला. रात्री उशीरापर्यंत तो घरी परतला नाही. कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. मात्र, त्याचा ठावठिकाणा लागला नाही.
गुरुवारी (ता. 11) सकाळी सातच्या सुमारास ससाणेनगर बोगद्याजवळ लोहमार्गाच्या मधोमध एका मुलगा मृतावस्थेत पडल्याचे रेल्वे कर्मचारी (ट्रॅक मन) प्रमोद सक्सेना यांनी काळेपडळ पोलिसांना दिली. त्यानंतर काळेपडळ पोलिसांचे पथक तेथे गेले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली.
लोहमार्ग ओलांडताना रेल्वेच्या धडकेत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. कुठलाही संशयास्पद प्रकार आढळला नाही’, असे काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, पंधरा दिवसांपूर्वी हडपसरमधील मांजरी परिसरात रेल्वेच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. अंधारात लोहमार्ग ओलांडताना दुर्घटना घडली होती.







