विशाल कदम
Pune News : हडपसर (पुणे) येथील समर्थ क्रॉप केअरचा बाजार उठल्याने संस्थाचालक प्रशांत गवळी व त्याचे 7 संचालकांनी गुंतवणूकदारांना दिवाळी गोड करतो. मग 3 टक्के व्याजासह परतावा देतो. नंतर डंके के चोट पर 1 डिसेंबरला पैसे देतो. असे आश्वासन दिले होते. परंतु, ही सर्व आश्वासने हवेतच विरली असून सर्व संचालक गायब झाले आहेत. गुंतवणूकदारांनी गुन्हा दाखल करू नये. म्हणून निर्जनस्थळी व्हिडीओ काढून सहानुभूती मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु ठेवला आहे. पण गुंतवणूकदारांना पैसे कधी देणार? या मूळ प्रश्नाला बगल देत गुंतवणूकदारांची दिशाभूल करत आहे. संस्थाचालकांनी गुंतवणूकदारांना दिलेले चेक सुद्धा बाऊन्स झाल्याने सद्यस्थितीत 40 हजाराहून अधिक गुंतवणूकदारांचा जीव टांगणीला लागला आहे. (Pune News)

दरम्यान, कोट्यवधी रुपयांचे व्यापारी साम्राज्य उभारणारे दादर येथील फिनफ्लुएन्सर अवधूत साठे यांची ट्रेडिंग अकादमी, ASTA, वर सेबीने कारवाई करून सुमारे 546 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. परंतु, हडपसर (पुणे) येथील समर्थ क्रॉप केअरचा आर्थिक घोटाळा हा अवधूत साठे यांच्या अकादमीपेक्षा 10 पटीने मोठा असताना देखील अद्यापपर्यंत सेबी, ईडी व आर्थिक गुन्हे शाखेने त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला जागे करण्याचे वेळ आली आहे.
समर्थ क्रॉप केअरने गुंतवणूकदारांना प्रतिमाह 10 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढले आहे. संस्थेने पुण्यासह राज्यातील 12 हून अधिक जिल्ह्यातील 40 ते 45 हजाराहून अधिक गुंतवणूकदरांची 4 ते 5 हजार कोटी रुपयांची बेकायदा माया गोळा केली आहे. परंतु, मागील पाच महिन्यांपासून ही संस्था दिवाळखोरीत गेल्याने कोणत्याही गुंतवणूकदाराला एक दमडीही मिळालेली नाही. पण काही दिवसांपासून संस्थाचालक प्रशांत गवळी व संचालक सुदामा दास, प्रकाश मांगने, नागनाथ जाधव, प्रकाश राठोड, ज्योतिबा काटकर, ओंकार कदम व चंद्रकांत राऊत हे सर्वजण फोन बंद करून पसार झाले आहेत.
एका गुंतवणूकदाराने व्हिडीओ माध्यमातून सांगितले आहे की, समर्थ क्रॉप केअरचे संस्थाचालक प्रशांत गवळी यांनी देवाच्या नावाखाली भांडवल उभे करून गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे. गुंतवणूकदार व्याजाचा परतावा न मागता केवळ मुद्दल मागत आहेत. परंतु, प्रशांत गवळी हा कोमात गेला आहे. आणि त्यांनी सर्व गुंतवणूकदारांना देखील कोमात ढकलले आहे. गवळी यांनी गुंतवणूकदारांसमोर येऊन पैशाचा हिशोब द्यावा. गुंतवणूकदारांनी गुन्हा दाखल केला तर आपले पैसे बुडतील. या भीतीने गुंतवणूकदार शांत आहेत.
दरम्यान, या प्रकारच्या फसव्या योजनेमध्ये गुंतवणूकदारांना मूळ मुद्दल मिळण्याची कधीच “शाश्वती” नसते. कारण या योजनेचा मूळ हेतू साखळीपद्धतीने पैसे गोळा करणे, सुरवातीला काही महिने परताव्याचे आमिष दिले जाते. परंतु, साधारणता 19 ते 20 महिने हे ठग पैसे गोळा करण्यासाठी नाना क्लुप्त्या वापरतात. ठराविक वेळेनंतर गुंतवणुकीचा ओघ कमी झाला आणि परताव्याचा वेग वाढला की, ठराविक रक्कम जमा झाल्याची खात्री पटल्यानंतर हे ठग गाशा गुंडाळून पोबारा करतात. हा इथून मागच्या सर्व प्रकरणांचा इतिहास आहे.
”पुणे प्राईम न्यूज”मुळे भविष्यात होणारी गुंतवणूदारांची फसवणूक टळली
समर्थ क्रॉप केअरला कोणतीही शासकीय परवानगी नाही. बेकायदा गुंतवणूक करत असल्याने हा राज्यातील संभाव्य मोठा आर्थिक घोटाळा होणार असल्याचे निश्चित होते. त्यामुळे दैनिक ”पुणे प्राईम न्यूज”ने मागील पाच महिन्यांपासून वेळोवेळी बातम्या प्रसिद्ध करून गुंतवणूकदारांना वारंवार सावध करत होते. त्यामुळे या फसव्या योजनेत हजारो गुंतवणूकदारांनी पैसे टाकणे बंद केले. आणि अखेर हा 4 ते 5 हजार कोटींचा घोटाळा उघडकीस आला. पुणे प्राईम न्यूजचे हे खूप मोठे यश असून भविष्यात गुंतवणूक करणाऱ्या हजारो नागरिकांची फसवणूक टळली आहे.
केडगावची सभा गाजविणाऱ्या महिला पदाधिकारी आता आवाज उठविणार का?
समर्थ क्रॉप केअरला ब्लॅकमेल केले जात आहे. अफवांना बळी पडू नका. हा बदनामी करण्याचा प्रयत्न आहे. कंपनीचे सर्व काम सुरळीत सुरू आहे. तुम्ही संस्थाचालक प्रशांत गवळी यांच्यावर विश्वास ठेवा. असे आवाहन सामाजिक संघटनेच्या एका संस्थापक अध्यक्ष असलेल्या महिलेने समर्थच्या बाजूने केडगाव (ता. दौंड) येथे केले होते. परंतु, समर्थ क्रॉप केअरचा बाजार उठल्याने संबंधित महिला पदाधिकारी आता आवाज उठविणार का? गुंतवणूकदारांना गुंतवणूक परत मिळवून देण्यासाठी तोंड उघडणार का? तेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
प्रशांत गवळीला गुंतवणूकदारांचे प्रश्न
1)टीम लिडरच्या माध्यमातून गोळा केलेल्या पैशाची गुंतवणूक किती व कुठे जमा केली याचे पुरावे देणार का?
2)संस्थांमध्ये रक्कम गुंतवली असेल तर आता रक्कम कुठे गेली?
3)कंपनी दिवाळखोरीत गेली असेल तर पुरावे द्यावेत?
4)हडपसर येथील कार्यालय का बंद ठेवले?
5)फोन नंबर का बंद ठेवले?
6)गुंतवणूकदारांनी कोणाशी संवाद साधायचा?
7)तीन वेळा दिलेली आश्वासने कुठे गेली?
8)गुंतवणूकदारांची दिशाभूल कधी थांबविणार?
9)गुंतवणूक केलेली रक्कम कधी देणार?
10) पत्रकार व राजकीय नेत्यांनी खंडणी मागितली असेल तर आतापर्यंत पोलीस ठाण्यात तक्रार का दिली नाही?






