पुणे : पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पुण्यात कबुतरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कबुतरांच्या विष्ठेमुळे मोठ्या प्रमाणात रोगराई वाढत आहे. असे असतांना नागरिक कबुतरांना मोठ्या प्रमाणात खायला देतात. अशातच पुणे महापालिकेने कबुतरांना खायला घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कबुतरांना दाणे टाकल्यास 500 ते 5000 रुपये दंड पुणेकरांना भरावा लागणार आहे.
यासंदर्भात पीएमसीने शहरातील विविध भागात सूचना लावल्या आहेत. यामध्ये पुणे महानगरपालिकेने म्हटलं आहे की, ‘शहरात कबुतरांच्या पिंसासह विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या जंतुमुळे ‘हायपर सेंसिटिव्ह न्यूमोनिया’चा आजार होत आहे. यामुळे शहरात फुफ्फुसाचा संसर्ग असलेल्यांपैकी सुमारे 65 टक्के लोकांना अतिसंवेदनशीलता न्यूमोनायटिसचे निदान झाले आहे. आम्ही नागरिकांना आवाहन करतो की कबुतरांना उघड्यावर खायला देऊ नका. तसे केल्यास त्यांच्याकडून दंड आकारण्यात येईल.
शहरातील विविध भागांत कबुतरांना धान्य टाकले जाते. यामुळे पुण्यात मोठ्या प्रमाणात कबुतरांची संख्या वाढल्याचे आढळलं होतं. कबुतरांच्या त्रासामुळे पालिकेचा आरोग्य विभाग, पर्यावरण विभागायने आता थेट मोहीम हाती घेतली आहे.