इंदापूर : सध्या बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Lok Sabha Constituency) घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या इंदापूर तालुक्यात सभा होत आहेत. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ अजित पवार इंदापूर तालुक्यात आज सभा घेत आहेत.
इंदापूर तालुक्यात अजित पवार यांच्या तीन सभा होणार आहेत. येथील सणसर, शेळगाव आणि निमगाव केतकीमध्ये अजित पवारांनी सभा होणार आहे.
यावेळी इंदापूरचे माजी आमदार आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील म्हणाले, काही गोष्टी वाटून घ्याव्या लागतील आणि द्याव्या ही लागतील. बारामतीपेक्षा इंदापूरचे मताधिक्य असले पाहिजे. आपला खासदार सत्तेच्या प्रवाहात नव्हता म्हणून निधी मिळाला नाही. एकत्र बसून निधी आणावा लागणार आहे. पाणी आणायला भक्कम नेतृत्व लागणार आहे. इंदापूर तालुक्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. हा पाणीप्रश्न सुटला पाहिजे.
याबरोबर इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून आपले दिवस चांगले सुरू आहेत. इंदापूरला आता पाण्याची समस्या सतावत आहे. दादांना एकच विनंती आहे की आम्हाला पाणी द्या. फडणवीस साहेबांना देखील एकच विनंती की नीरा देवधरचं पाणी द्या. अन्यथा आमचा शेतकरी अडचणीत येईल. आमच्या शेतकऱ्यांची शेती उध्वस्त होईल.