लोणी काळभोर : शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी लाखो अनुयायी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारीला येतात. त्या अनुषंगाने बंदोबस्ता करीता पोलीस दल सज्ज झाले असून पेरणे फाट्यासह परिसरात पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. यामध्ये पोलीस आयुक्तांसह पोलीस अधीक्षक, 707 अधिकारी, 5500 पोलीस अंमलदार , 2100 होमगार्ड यांच्यासह जवानांच्या तुकड्यांचा मोठा फौजफाटा असणार आहे. आणि हा बंदोबस्त आज सोमवारपासून (ता.30) सुरु झाला आहे.
पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, विवेक मासाळ, स्मार्तना पाटील, राजेंद्र कुमार शिंदे यांच्यासह आठ पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, राहुल आवारे, भाऊसाहेब पठारे, सरदार पाटील यांच्यासह 34 सहाय्यक पोलीस आयुक्त, 71 पोलीस निरीक्षक, 265 पोलीस अधिकारी, 2406 पोलीस अंमलदार, 592 होमगार्ड व स्ट्रायकिंग पथके बंदोबस्तासाठी सज्ज झाले आहेत. तर पुणे जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्यासह 7 अपर पोलीस अधीक्षक, 23 उपविभागीय पोलीस अधिकारी, 306 पोलीस अधिकारी, 3080 पोलीस अंमलदार, 1500 होमगार्ड, 12 एस. आर. पी. एफ. च्या तुकड्या व 7 BDDS च्या पथकाचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीस विभागाकडुन 165 सी. सी. टी. व्ही कॅमेरे, 6 ड्रोन कॅमेरे, व पी. ए. सिस्टीम ची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पुणे जिल्हा प्रशासनाकडून सर्वाकरीता पिण्याचे पाणी, टॉयलेट, लाईट इत्यादी व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे अभिवादना करीता येणाऱ्या अनुयायांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होवु नये. यासाठी पूर्णपणे तयारी करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होवु नये, यासाठी पोलीस प्रशासन पुर्णपणे सज्ज झाला आहे.
नगररोडकडून येणारे अनुयायी यांच्यासाठी वक्फ बोर्ड तसेच टोरंट गैस पार्किंग जातेगाव खु, चाकण रोड या ठिकाणी पार्किंगची मोठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. वाहने पार्किंग व सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था पोलीस दलाकडून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पार्किंग ठिकाणाहुन डिंग्रजवाडी फाटयापर्यंत पी. एम. पी. एल बसेस च्या माध्यमातून अनुयायांना ने आण करण्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. पार्किंग ठिकाणी लाईट, हिरकणी कक्ष, टॉयलेटची व्यवस्था व इतर सुविधा देखील करण्यात आलेल्या आहेत. भिमा नदीवरील ब्रिज ओलांडुन अनुयायी अभिवादन करण्याकरीता जयस्तंभा पर्यंत जावु शकतात. अनुयायांना सहकार्य करुन अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडावा. असे आवाहन पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.
लढाईच्या स्मरणार्थ विजय स्तंभ
1 जानेवारी 1818 मध्ये इंग्रज आणि पेशव्यांमध्ये एक ऐतिहासिक लढाई झाली होती. या लढाईत महार आणि इतर समाजातील सैनिकांच्या पराक्रमामुळे ब्रिटिशांनी पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केला होता. हे युद्ध जिंकल्यानंतर त्याच्या स्मरणार्थ कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ बांधण्यात आला. या विजय स्तंभाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1 जानेवारी 1927 ला भेट दिली. आणि हा इतिहास पुढे आणला. तेव्हापासून या ठिकाणी शौर्य दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. भीमअनुयायी या ठिकाणी येवून त्या लढाईत गतप्राण झालेल्या शूरवीर सैनिकांना अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहतात.
भीम अनुयायांनी विजय स्तंभाला अभिवादन करून शौर्य दिनाचा कार्यक्रम शांततेत पार पडण्यासाठी पोलीस विभागास सहकार्य करावे. तसेच जिल्ह्यातील पर्यटन स्थळावर 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरीक येत असतात, त्याअनुषंगाने पोलीस दलाकडून खबरदारीची उपाययोजना घेण्यात आलेली आहे. दारु पिवुन वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. 31 डिसेंबर हा संयमाने, जबाबदारीने साजरा करुन इतरांना त्रास होणार नाही किंवा इतरांचा जीव धोक्यात येणार नाही. याची सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी.
-पंकज देशमुख (पोलीस अधीक्षक – पुणे जिल्हा (ग्रामीण)