Pune Crime : पुणे: पुणे शहरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने एक मोठी कारवाई केली असून यामध्ये एका आलिशान फॉर्च्युनर गाडीतून गांजाची तस्करी करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. लोणी काळभोर परिसरातील थेऊर येथे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी या कारवाईत सुमारे 40 लाख 70 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव प्रितम रवींद्र कुंजीर असून तो 32 वर्षांचा आहे. तो थेऊर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांना एका गुप्त बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली होती. पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्युनर गाडीतून मोठ्या प्रमाणात गांजा विक्रीसाठी आणला जाणार असल्याचे समजले होते. या माहितीची गांभीर्याने दखल घेत अंमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी रात्रीपासूनच थेऊर परिसरात सापळा रचला होता. रात्रभर पाळत ठेवल्यानंतर पहाटे 5 च्या सुमारास संशयित पांढरी फॉर्च्युनर गाडी तिथे आली. पोलिसांनी तात्काळ गाडी अडवून तिची झडती घेण्यास सुरुवात केली.
सुरुवातीला चालकाने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र गाडीची कसून तपासणी केली असता पोलिसांना मोठा धक्का बसला. गाडीमध्ये 53 किलो 14 ग्रॅम वजनाचा गांजा लपवून ठेवलेला सापडला. पोलिसांनी गांजासह ही महागडी फॉर्च्युनर गाडी आणि मोबाईल फोन असा एकूण 40 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला आहे. आलिशान गाड्यांचा वापर करून नशेच्या पदार्थांची तस्करी केली जात असल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे आणि सहायक आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांच्या पथकाने ही कामगिरी फत्ते केली आहे. आरोपी प्रितम कुंजीर हा केवळ एक मोहरा आहे की यामागे मोठे रॅकेट कार्यरत आहे, याचा तपास आता पोलीस करत आहेत. या घटनेमुळे थेऊर आणि लोणी काळभोर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.







