पुणे : शहरात पुन्हा एकदा कोयता गॅंगने दहशत घालण्यात सुरुवात केली आहे. लोहगाव येथील साठे वस्ती परिसरात दोन ते तीन तरुणांनी कोयता आणि दगडांचा वापर करून वाहनांची तोडफोड करत दहशत माजवली आहे. यात पाच दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. या कृत्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. घटनास्थळी झालेल्या तोडफोडीमुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या व्हिडिओची पुणे पोलीसांनी गांभीर्याने दखल घेतली असून या तरुणांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. आरोपींचा शोध घेऊन लवकरच अटक केली जाईल, असं पोलीसांकडून सांगण्यात आलं आहे. पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचं आणि घाबरून न जाण्याचं आवाहन केलं आहे. स्थानिक रहिवाशांनी घडलेल्या प्रकारामुळे पोलिसांकडे तक्रार नोंदवली असून, दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, कोयता गॅंगचा हा प्रकार काही दिवसांपासून शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. अशा घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.