पुणे : पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी १४ डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता होणार आहे. मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांचा पहिलाच पुणे दौरा असल्याने सर्वांनाच उत्सुकता आहे. त्यामुळे उद्घाटन समारंभाला पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी केले आहे.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर येत्या १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनाची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राजेश पांडे बोलत होते. या महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात सुरू असून, उद्घाटनाचा कार्यक्रम हजारो पुणेकरांच्या उपस्थितीत जल्लोषात होणार असल्याचे देखील पांडे यांनी सांगितले.
राजेश पांडे पुढे बोलताना म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे. देवेंद्र फडणवीस महोत्सवातील पुस्तकांच्या स्टॉलला भेट देऊन, लेखक, साहित्यिक, प्रकाशकांशी संवाद साधणार आहेत. या निमित्ताने पुणेकरांना देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळेल.
उद्घाटनाचा मुख्य कार्यक्रम फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या भव्य स्टेजवर होणार आहे. या कार्यक्रमाला कुलगुरू, साहित्यिक, लेखक, कवी, चित्रकार, संपादक, प्राचार्य अशी अनेक मंडळी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला असल्याने, पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वाचन संस्कृतीला वाढविण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहनही राजेश पांडे यांनी केले आहे.
आज ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ उपक्रम
पुणे पुस्तक महोत्सवांतर्गत ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ हा उपक्रम बुधवारी (दि. ११) दुपारी १२ ते १ या या वेळेत आयोजित केला आहे. अप्पा बळवंत चौकासह विविध शाळा, महाविद्यालये, पुणे मेट्रो स्टेशन, पीएमपीएमएल बस भांगे, विमानतळ, कारागृह, वाचनालये, ग्रंथालये अशा वेगवेगळ्या ठिकाणी उत्साहात लोक एकत्र येऊन पुस्तकाचे बाचन करणार आहेत.
ग्रंथालयांच्या वाचकांचा ‘एक तास वाचनासाठी’
शांतता… पुणेकर वाचत आहेत या उपक्रमात पुण्यासह राज्यभरातील सर्व सार्वजनिक ग्रंथालयांतील वाचकही सहभाग घेणार असून, एक तास वाचनासाठी देत साहित्यसंस्कृतीचा जागर करणार आहेत. उपक्रमात सर्व ग्रंथालयांच्या वाचकांना सहभागी करून घेण्यासाठी राज्य ग्रंथालय संचालनालयाने पुढाकार घेतला आहे.
ग्रंथदिंडीत १०० पेक्षा अधिक महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा सहभाग
महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी शनिवारी (दि. १४) शंभरपेक्षा अधिक महाविद्यालयांतील विद्यार्थी, विविध क्षेत्रांतील व्यक्तींचा सहभाग असलेली ग्रंथदिंडी ने प्रमुख आकर्षण ठरणार आहे. महाराष्ट्रीय संस्कृतीचे दर्शन घडवत पुष्पातील साहित्यिक, समाजसुधारक या संकल्पनेवर ही ग्रंथदिंडी आधारित असेल. तसेच, पुस्तक बाचनाचे महत्व या ग्रंथदिंडीतून अधोरेखित केले जाणार आहे. शनिवारी टिळक रस्ता येथील न्यू इंग्लिश स्कूल ते फम्र्युसन महाविद्यालय या मार्गावर दुपारी दीड वाजता ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. यात पुणे शहर आणि परिसरातील १०० पेक्षा अधिक महाविद्यालयांतील विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांचा सहभाग असणार आहे.