पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात चार हजार ६७८ घरांसाठी डिसेंबर महिन्यात पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाकडून (म्हाडा) सोडत काढण्यात येणार आहे. याशिवाय प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ४०३ सदनिकांची सोडत काढण्यात येणार असल्याचे ‘म्हाडा’कडून सांगण्यात आले आहे.
पुणे मंडळामार्फत ‘म्हाडा’च्या विविध योजनेतील दोन हजार ८३० सदनिका आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत एक हजार ४३५ सदनिकांची सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीसाठी ऑनलाइन नोंदणीचा आरंभ नवीन प्रणालीनुसार करण्यात येणार आहे. नवीन प्रणालीमुळे नागरिकांना मोबाइल अॅपच्या माध्यमातून नोंदणी, अर्ज भरणे आणि पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील यांनी दिली.
‘म्हाडा’कडून २०१६ सालापासून ऑनलाइन पद्धतीने सदनिकांचे वितरण करण्यात येत आहे. आतापर्यंत ३४ हजार ४९३ सदनिकांचे वितरण करण्यात आले आहे. यापैकी २० टक्के सदनिका या सर्वसमावेशक योजनेंर्गत येत असून, या अंतर्गत ११ हजारांवर सदनिका ऑनलाइन पद्धतीने सोडत काढून त्यांचे वितरण करण्यात आले आहे. या ऑनलाइन सोडतीमध्ये २०१६ सालापासून ४५ लाख ३४ हजार ७२ नागरिकांनी सहभाग घेतला आहे. करोनाचा प्रादुर्भाव असतानाही म्हाडाने १५ हजार ४७७ सदनिकांची सोडत काढून वितरण केले आहे.
दरम्यान, रहाटणी, खराडी, पुनावळे, थेरगाव, बोऱ्हाडेवाडी-मोशी, मुंढवा, किवळे, चिखली, ताथवडे, जाधववाडी-चिखली, चऱ्होली, खडकवासला, वडमुखवाडी, चोविसावाडी, धानोरी, डुडूळगाव, बालेवाडी, चाकण-म्हाळुंगे फेज, आंबोडी रस्ता-सासवड, सर्व्हे क्र. १७१२ दिवे-पुरंदर, ताथवडे टप्पा-१, पिंपरी-वाघिरे परिसरातील सदनिकांसाठी सोडत काढण्यात येणार आहे.